Friday, October 16, 2009

रतनगडच्या माथ्यावर धुकं... धुकं......धुकं.. (3 Oct. 09)

येत्या शनीवारी रतनगडला येतोस कां?' ह्रषीकेशची विचारणा माझ्या chatbox वर झळकली, त्यावर माझी प्रतिक्रिया 'हो'च असण्याला मुख्य कारण म्हणजे माझ्या नविन कॅमेर्‍याला पहिल्या ट्रेकसाठी रतनगडासारखी तालेवार शिकार मिळत होती. ठरल्याप्रमाणे ठरल्याघरी ठरल्यावेळी ठरल्या सवंगडयांची जमवाजमव झाल्यानंतर स. ६ वा. निघालो. नविनच झालेल्या मुंबई एक्स. वे वरुन घोटी गाठायला फारसा वेळ लागला नाही. घोटीला रेल्वे crossing कडे रस्ता वळतो, त्या तिठ्यावर hotel संताजीमध्ये तर्रीदार मिसळ, पोहे व चहा हाणला. पुढे रस्त्यावरील खड्ड्यांसाठी टोल घेणार्‍या महाराष्ट्रातील एकमेव टोल नाक्यावर रु. ३१.५० मात्र टोल भरुन भंडारदर्‍याकडे कूच केले.
शेंडी गांवाजवळील भंडारदरा धरण काठोकाठ भरलेलं होतं. शेंडीपासून पुढे २ किमी. वर उजवीकडे रतनवाडीचा फाटा लागतो. जलाशयाच्या कडेने वळवळत जाणार्‍या रस्त्याने १८ किमी. वरची रतनवाडी गाठली. हा रस्ता पुढे सरळ ७ किमी. वरील साम्रदला जातो. येथील सांदण दरी प्रसिद्ध आहे. तिथून ५ किमी. घाटघर व तिथून २२ किमी शेंडी अशी ५४ किमीची जलाशय परीक्रमा आहे.

रतनवाडीत शिरल्याबरोबर उजवीकडे कोरीव कामाने नटलेली पुष्करणी दिसते. इथून जवळच अम्रुतेश्वर मन्दिर आहे. सध्या मन्दिराच्या जिर्णोद्धाराचं काम चालू आहे. रतनगडावरुन आलेल्या प्रवरा नदीच्या ओढ्याकाठाने निघाल्यावर अर्ध्या तासात गडाचा पायथा गाठता येतो. पायथ्यापासून तासाभरांत पहिल्या गणेश दरवाजाच्या शिडया गाठेपर्यंत खाली उतरणारे दोन ग्रुप्स भेटले. गांधी जयन्ती व शनी-रवी एकत्र आल्यामुळे ३ दिवसांच्या सुट्टीची ही गर्दी होती. गांबुडाचे (हेमंत देशमुख. गांबुडा शब्दाचा अर्थ हवा असल्यांस ग्रंथभवन, नासिक फोन २५८११८५ वर संपर्क करावा) सतत फोन चालू होते आणि walk n talk ऐवजी त्याचे stop n talk चालू असल्याने चढाई व नंतर उतराई दोन्हीला वेळ झाला. पुढील वेळी चुक भूल सुधारली जाईल अशी वेडी आशा करुया. दोन शिड्या चढ्ल्यावर येणार्‍या गणेश दरवाजाच्या डाव्या भिंतीवरगणेशमूर्ती कोरली आहे. पायर्‍यांनी वर चढून रत्नादेवी गुहा, हनुमान दरवाजा (यांवरही मारुती, भैरव, मत्स्यावतार कोरलेले आहेत), राणीचा हुडा इ. बघून कात्राबाईच्या दिशेकडील दगडी बुरुजाकडे आलो. संपुर्ण धुक्यामुळे काहिच दिसणे शक्य नव्ह्ते. राणीच्या हुड्याजवळील टाकी पाहून पुढे निघालो. टाक्याजवळच कोंबडीची पिसे व इतर घाण पडलेली होती. ही घाण करणार्‍यांचा धिक्कार असो. पुढील जन्मी त्यांची पिसे ऐतिहासिक ठिकाणांऐवजी खाटिकांच्या दुकानांत निघायला हवीत.

आश्विनांतल्या तरारून फुललेल्या सोनकीच्या लाखों फुलांनी रतनगड झळाळला होता, मात्र धुक्यामुळे डावीकडील कोकणातल्या बाण सुळक्याचे दर्शन घडण्याचा योग आज नशिबी नव्ह्ता. कोकण दरवाजा पाहून तुडुंब भरलेल्या टाक्यांपाशी शिदोर्‍या सोडल्या. थोडा वेळ पाठ टेकवून रतनगडाचे वैशिष्ट्य असलेले नेढे ओलांडून त्रिंबक दरवाजात उतरलो. हा दरवाजा हळुहळू ढासळत चालला आहे. पायर्‍या उतरल्यानंतर खुट्टा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत सुरेख फुललेल्या तेरड्याच्या लाखो फुलांनी आमचे स्वागत केले. पुरुषभर उंचीचं तेरड्याचं रोप मी तरी प्रथमच पाहिलं. खुट्टयाच्या खिंडीतून खाली रतनवाडीत पोहोचायला दिड तास लागला. साम्रद्ची सांदणदरी पुढच्या वेळी पुन्हा यायला निमित्तासाठी बाकी ठेवून परतीला लागलो. ७ वा. नासिक.

सहभागी:ह्र्षीकेश वाकदकर, रोहित धारडे, हेमंत पोखरणकर, सारंग ढोके व हेमंत देशमुख.



4 comments:

  1. Dear Hemant..

    The blog is very nice. I will appreciate if you keep posting for every trek.

    Thanks
    Hrushikesh Wakadkar
    www.eluminoustechnologies.com

    ReplyDelete
  2. mast re , gambuda hota manun apan sarwa aplya priya mira rohit sathi chatak pakshasarkhe welt yeu sakalo--- he kankawalichya goni dandekarni samjun ghyawe.

    ReplyDelete
  3. प्रिय हेमंत,
    लेख खूपच आवडला. आता तुझया बाकीच्या लेखांचीही ब्लॉग वर प्रतीक्षा आहे. हृषीकेश कडून तुझया इतर लेखांबद्दल समजते. पण ते लेख पुणे आवृत्ती मधे प्रसिद्ध होत नाहीत. तरी ब्लॉग वर सतत लिहीत जा. म्हणजे आम्हा पुणेकर लोकांना पण त्याचा आस्वाद घेता येईल.
    वि.सू.: तुझे रतनगडाचे बाकीचे फोटो पण दाखव.

    ReplyDelete
  4. Hello Hemant,
    This is really good, please post your all the trek experiences on this blog, so at least vertually i can njoy the treking.

    Regards,
    Hari Gore

    ReplyDelete