Sunday, July 18, 2010

एक सकाळ फळाफुलांची..

नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री. धर्मेश त्रिवेदी यांचं 'हेल्थकेअर फुड अँड ज्युस' नांवाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. राहुल सोनवणेनं फोनवरून, खंडोबाच्या टेकडीवर जाणार असशील तर या ठिकाणी आवर्जून जायला सांगितलं होतं. तसं देवळाली कँपमध्ये 'भारत कोल्ड्रिंक्स' कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्रिवेदींचं हेल्थकेअर फुड- ज्युस सेंटर, बाहेरून बाकी सामान्यपणे ज्युस सेंटर असतं तसंच..! ..बाहेरच मांडलेल्या खुर्चीवर बसून मेनुकार्डवर नजर फिरवतांना नेहमीच्या सवयीप्रमाणे वेगळं काही ढोसणेबल आहे कां ते बघत असतांना एकदम कोकोनट मिल्कच्या म्हणजे नारळाचं दुधाच्या कॉलमपाशी थबकलो. खवलेलं ओलं खोबरे वाटून पिळल्यावर जो रस निघतो तो म्हणजे नारळाचं दुध. नारळाचं दुध आतापर्यंत उकडीच्या मोदकांबरोबर, तांदळाच्या शेवयांबरोबर, कैरीच्या आमटीत, पुरणपोळीबरोबर,सोलकढीत अशा सपोर्टिंग पोझिशनला चाखलेलं, ...पण डायरेक्ट मेन रोलमध्ये पेयांत? .. त्यांतही प्रकार , म्हणजे १) प्लेन नारळाचं दुध २) नारळाचं दुध आणि गुलकंद ३) नारळाचं दुध आणि खजूर ४) नारळाचं दुध आणि चॉकलेट ५) नारळाचं दुध आणि अंजीर.
याशिवाय मुगाच्या आणि मक्याच्या पोह्यांचे चाट आणि वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस हेही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. येथील ज्युसचं वैशिष्ट्य म्हणजे साखर कशातही घालत नाहीत, त्यामुळे फळाची मूळ चव जीभेवर येते. पार्सल देतांनाही ग्राहकाला १ तासाच्या आत ज्युस संपवण्याची सूचना त्रिवेदीजींनी दिलेली मी ऐकली. ऑर्डर द्यायला काउंटरवर पोहोचताच प्रसन्न व हसतमुख अशा धर्मेश त्रिवेदींशी बोलतांनाच डाव्या हाताला लक्ष गेलं. काउंटरवरच ठेवलेल्या टेराकोटाच्या पसरट भांड्यात पिवळीजर्द कण्हेर व जरबेराच्या फुलांची रांगोळी रेखीवपणे मांडलेली दिसली. ..अक्षरशः खेचला गेलो!

..समोर साईबाबांच्या प्रतिमेच्या पुढ्यातही वेगळी पुष्परचना मांडलेली होती. भराभर फोटो काढले.

त्रिवेदीजी आणि त्यांचे मदतनीस गालात हसत माझा हा उद्योग बघत होते. पोटोबा झाल्यानंतर पुन्हा मी फुलांच्या सजावटीकडे वळालो. पण याबाबत काही छेडण्याआधीच त्यांनी छोटासा अल्बमच समोर ठेवला. पूर्वी वेगवेगळ्या रंगांचे धान्य वापरूनही ते विविध रांगोळ्या बनवत असत, पण त्यासाठी लागणारा प्रचंड पेशन्स आणि जाणवू लागलेला पाठीचा त्रास यामुळे धान्यरंगावलीचा छंद कमी केला. व्यवसायानिमित्ताने एकदा पाँडीचेरीला गेले असतांना मदर मेरीच्या समोर विविध पुष्पगुच्छांची केलेली आकर्षक सजावट मनाला भावून गेली. स्वतःच्या दुकानातही फुलांची अशी काही छोटी सजावट करता येईल असा निर्मितीविचार मनात घेउन रोज नविन काहीतरी वेगळी सजावट करता करता हजारो देखण्या पुष्परंगावल्या साकार झाल्या. सुरूवातीला नुसत्या फुलांची रांगोळी फुले लवकर सुकून जात असल्याने त्यांनी पाण्यावर फुलांची रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि आता ते विविध आकारांची छोटी भांडी वेगवेगळ्या आकारांसाठी वापरतात.

रानफुले असोत किंवा राजफुले असोत, त्रिवेदीजीं त्यांच्या सजावटीत प्रत्येक पाकळीला न्याय देतात. प्रत्येक फुलाचा रंग, आकार वेगळा त्यानुसार मांडणीत प्रत्येकाचं स्थानही उठावदार ठरतं.

त्यांच्या मोबाईलवर शेकडो सजावटींचे फोटो पहायला मिळतात आणि ते उत्साहाने दाखवतातही. त्यापैकी काही रचना...





साधारण २ दिवसांपर्यंत सजावट टिकून रहाते, त्यानंतर मात्र त्यांतील ताजेपणा उणावायला लागतो. मग एवढी मन ओतून केलेली सजावट मोडतांना इमोशनल अत्याचार होत नाही कां? या माझ्या शंकेवर स्मित करत त्यांनी उत्तर दिलं '..जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'क्या बात है!
ज्युसमध्ये घालायच्या साखरेचा सर्व गोडवा त्रिवेदीजींच्या जीभेवर पसरला आहे. निघतांना त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड मागितल्यावर पुन्हा साखरेची उधळ्ण झाली - 'आप जैसे मित्रही मेरे व्हिजिटिंग कार्ड है. इसलिये मुझे उसकी जरुरत नही लगती.' एकशे एक टक्के खरं आहे!!!

Friday, July 16, 2010

खंडोबाची टेकडी

खंडोबाची टेकडी हे ठिकाण माहित नाही असा माणूस नासिकमध्ये विरळाच! नासिकपासून १५ किमी. वरील देवळाली कॅंप भागात असलेली ही टेकडी स्वच्छ, मोकळ्या हवेमुळे व निरव शांततेमुळे प्रसिद्ध आहे. देवळालीतून निघाल्यावर काही मिनिटांतच टेकडीजवळ पोहोचायला होतं.हा संपूर्ण भाग सैन्याच्या ताब्यात असल्याने पायथ्यापाशी जवान उभे असतात. पायथ्यापाशीच डावीकडे एक तोफ दिसते. चढाईच्या सुरूवातीलाच या ठिकाणाबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्यांत या टेकडीचा विश्रामगड आणि शिवाजीमहाराजांच्या या टेकडीवरील वास्तव्याचा चुकीचा उल्लेख आहे. खरं तर विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला व महाराजांचं वास्तव्य पट्टा किल्ल्यावर होतं. असो. टेकडी चढतांना रूंद व कमी उंचीच्या पायर्‍या असल्याने दमछाकही फारशी होत नाही. टेकडीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे. माथ्यावरील घुमटाकृती खंडोबाच्या मंदिराला आटोपशीर तट आहे.




मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...



..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.



गाभार्‍यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.

अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...