Saturday, December 4, 2010

सुवर्णदुर्गाच्या मुलुखांत...भाग १

संयोजन- चक्रम हायकर्स, मुलुंड.

दि. २८.११.२००९
रात्री १ वा. मुलुंडहून निघालो. सकाळी ६ वा दापोली. पावणेसातला सालदुरे (मुरुड) इथे पोहोचलो. आसुदच्या जोशींनी अनिष निवासमधील (प्रोप्रा प्रताप भोसले. फोन २३४६१५-२३४८९७) डॉरमेटरीमध्ये व्यवस्था करुन ठेवली होती. या जोशींचं आसुदमध्ये समाधान नांवाचं हॉटेल आहे. (फोन- (०२३५८) २३४५२६, २३४५६१). झटपट फ्रेश होवून, चहा घेउन मुरुड बीचवर गेलो. हंगाम असल्याने भरपूर सीगल्स होते. उजवीकडे लांबवर समुद्रात शिरलेला कनकदुर्गाचा भूपट्टा दिसत होता.
हॉटेल समाधानमध्ये नाश्त्याला चविष्ट मिसळ, बटाटावडा, पोहे व परत चहा इ. उरकून पुढे केशवराज थांब्याव्रर- दाबकेवाडीत उतरलो. इथून पोफळीच्या आगारातून व गर्द झाडीच्या आसूद बागेतून केशवराज मंदिराकडे जाणारी वाट अत्यंत सुंदर आहे. वाटेत २ ठिकाणी गुलाबी फुलांचा गालीचा अंथरलेला होता.

वाटेत एक ओढा ओलांडावा लागतो. पूर्वी यांवर एक लाकडी सांकव होता. आता बळकट पूल बांधला आहे. हा संपूर्ण परिसर श्री. ना. पेंडशांच्या 'गारंबीचा बापू' कादंबरीतला परिसर आहे. त्या कादंबरीवर निघालेल्या चित्रपटाचं शुटींगही इथलंच.केशवराज मंदिराच्या थोडं अलिकडे डाव्या बाजूला उघड्यावर एक शिवलिंग दिसतं. रम्य झाडीतल्या केशवराजासमोर बारमाही धो धो पाणी वहाणारं गोमुख आहे. गोमुखांतून येणारं पाणी वरच्या डोंगरातून ज्या दगडी पाटपन्हळीतून आणलं आहे, ती व्यवस्थाही बघण्यासारखी आहे.

एका झाडाच्या बुंध्यातून हा प्रवाह १२ महिने सुरू असतो. त्या ठिकाणच्या 'अ‍ॅनोडेंड्रॉन' जातीच्या वेलीचे वळकट्यांचे आकारही बघण्यासारखे. केशवराज मुर्तीचा आयुधक्रम पद्म, शंख, चक्र, गदा असा आहे. बाजूलाच एक गणपतीचं स्थान आहे. दाबकेवाडीतही एक गणपती मंदिर आहे.
इथून पुढे हर्णै गांवात गेलो. सकाळी दिसलेल्या कनकदुर्गाच्या भुपट्ट्याच्या पायथ्यातूनच जेट्टीकडे जाणारा रस्ता आहे. जातांना उजवीकडे दणकट तटबंदी असणारा गोवा किल्ला दिसतो. नंतर दाट वस्ती असलेला फतेगड व शेवटी lighthouse असलेला कनकदुर्ग! नावाडी आधीच ठरवलेला असल्याने जास्त वेळ गेला नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या फयान वादळाची तारीख ११.११.२००९ एका खडकावर लिहीलेली होती. एका नांवेत ११- १२ जण याप्रमाणे आमच्या ३ नांवा सुवर्णदुर्गाकडे निघाल्या.

२०- २५ मि.त पिवळ्याधमक रेतीच्या पुळणीवर नांव लागली.
२ एकर जागा व्यापलेला सुवर्णदुर्ग १६६० च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी जिंकला व त्याची फेरबांधणी केली. खडक फोडून तयार केलेली तटबंदी हे 'सुवर्णदुर्गा'चं वैशिष्टय़..छ्त्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुवर्णदुर्गावर सिद्दींचे आक्रमण झाले असता मुख्य किल्लेदाराची फितुरी कान्होजींनी उघडकीस आणली व त्याचा शिरच्छेद करून लढ्याची सुत्रे हातांत घेउन हल्लाही परतवून लावला. यामुळे नंतर 'सरखेल' या पदवीबरोबरच मराठी आरमार प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. १६९६ च्या सुमारास हा दुर्ग आंग्र्यांचे केंद्र होते.

एक थोडी विषय सोडून अवांतर माहिती म्हणजे 'सुवर्णदुर्ग' पुन्हा चर्चेत आला तो ब्रिटीश राजवटीत.. त्याबद्दल इथे वाचा..

हेही वाचा..
सर विल्यम जेम्स
सेवेनद्रुग कॅसल

१८०२ साली यशवंतराव होळकरांच्या हल्ल्यामुळे २ रा बाजीराव पुणे सोडून काही काळासाठी सुवर्णदुर्गावर आश्रयाला होता. नोव्हें. १८१८ साली इंग्रजांनी पेशव्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतला.
या दुर्गाची चहूंकडील शाबूत दणकट तटबंदी लक्षवेधी. गोमुखी बांधणीच्या दरवाजाकडे जातांना बाहेरील बाजूंस आणखी काही तटबंदीसारखं बांधकाम दिसतं! तिथेच डावीकडे दोन तोफा पडलेल्या आहेत. उंच बुरुजांमधुन शिरल्यावर मुख्य प्रवेशद्वारापुर्वी उजव्या हातांस मारुती व द्वाराच्या पायरीवर कासव कोरलेले आहे. आंत दोन्ही बाजूंस देवड्या आहेत. पैकी डाव्या देवडीत आणखी एक खोली व बाहेरुन तटावर जायला सोपान आहे. वर चढल्यावर उजवीकडे तटावर ध्वजस्तंभ आहे. डावीकडील वाट सरळ पलिकडील तटातल्या चोरदरवाज्याकडे जाते. चोरदरवाज्याचं बांधकाम पहाण्यासारखं आहे. ओहोटीवेळी दुर्गाला प्रदक्षिणाही घालता येते. पुढे हिरव्या शेवाळाने रंगलेली पाण्याची प्रचंड टाकी.. ध्वजस्तंभाच्या खालच्या बाजुला विहीर व बांधकामाचे काही अवशेष दिसतात. तटावरून फिरतांना फांदीवर एक घरटे व निळसर अंडी दिसली. सुवर्णदुर्गाचा आकार फुलपाखराप्रमाणे आहे. प्रचंड माजलेल्या गवतामुळे सर्व अवशेष नीट बघता आले नाहीत. होडीतून हर्णैकडे परततांना डॉल्फिनने दर्शन दिले. मुरूडच्या किनार्‍यावरून डॉल्फिन बघायला होडीवाले खोल समुद्रात पर्यटकांना घेउन जातात. इथे इतक्या सहज डॉल्फिन दिसणं हा आमच्यासाठी बोनसच होता.जेटीवर आल्यावर पाणी भरून लगेच जेवायला बसायचा बेत होता, पण इथे आणखी एक अडचण समजली म्हणजे पिण्याचे पाणी आधीच भरून आणायला हवं. सुवर्णदुर्गावरही सहजी पाणी नाही. शेवटी भुकेल्या व तहानेल्या अवस्थेतच आधी कनकदुर्ग बघायचं ठरवलं! सुरूवातीच्या दोन बुरूजांमधून थेट वर काँक्रीटच्या पाखाडीने दीपगृहाकडे निघालो.

उजवीकडे खाली पाण्याची खोदीव टाकी आहेत. हे दिपगॄह १०० वर्षांपुर्वीचं व कोकण किनार्‍यावरील सगळ्यात जुनं आहे. वर सोलर सिस्टीम असल्याने वर जाता येत नाही. फतेगडावर दाटीने कोळी वस्ती असल्याने तो नीट बघता येत नाही आणि किल्ल्याच्या खुणाही नाहीशा झाल्या आहेत. आणखी थोडं पुढे आल्यावर गोवा दुर्गाचं प्रवेशद्वार दिसलं, तिथे वॉचमनकडे नोंदणी करुन आत शिरलो. या ठिकाणी तटबंदी पडलेली आहे.उजव्या बाजुस असलेले मुख्य प्रवेशद्वार चिणून बंद केलं आहे. या दरवाजावर बाहेर समुद्राच्या बाजूने तळांत गंडभेरुंड व त्याने पकडलेल्या ४ हत्तींचं शिल्प आहे. सध्या इथे सगळी घाण आहे आणि या दुर्मिळ शिल्पावर पांढरा रंग फासला आहे. बाजूला तटांत मारुती आहे. किल्ल्याची तटबंदी बर्‍या अवस्थेत आहे. सुवर्णदुर्गाचं इथून सुरेख दर्शन होतं. जास्त वेळ न घालवता आमच्या गाडीनं आंजर्ल्याकडे मोर्चा वळवला. आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. येथील गणेशमूर्ती साडेतीन- चार फूट उंचीची आहे. मंदिराची स्थापना इ.स. १४३० च्या सुमाराची असावी. पूर्वी लाकडी बांधकाम होतं. सध्याचं मंदिर १७८० मध्ये बांधलं गेलं आहे. चारही बाजूने संरक्षक भिंत असून समोरील भागांत दगडांत मोठं तळं खोदलेले आहे. आम्हांला सुवर्णदुर्गामागील सूर्यास्त अनुभवायचा होता पण इथूनही सुर्यास्त सुरेख टिपता आला.

आजच्या दिवसभराच्या सुंदर भटकंतीवर कळस चढवला तो समाधान हॉटेलातील उत्तमपैकी जेवणाने... वालाची उसळ आणि सोलकढी...! रात्री झक्कास झोप लागली!
(क्रमशः...)

Tuesday, October 12, 2010

भंभागिरी - १५ ऑगस्ट २०१० भाग २

भामेरकडे वळतांनाच 'बलसाणे २५किमी' ची पाटी बघितल्यावरच डोक्यात ट्युब पेटली होती की, प्राचिन मंदिराचा ठेवा असलेलं धुळे जिल्ह्यांतलं ते हेच गांव, पण आत्तापर्यंत कुठेही वाचनात हे नव्हतं की भामेरपासून बलसाणे इतक्या जवळ आहे. पोटपूजा आटोपून बलसाण्याकडे जाण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं होतं. साक्री- नंदुरबार मार्गावर बलसाण्याचा फाटा लागतो. फाट्यापासून ३-४ किमी. आत गांव आहे. मंदिराची चौकशी केल्यावर सगळे जैन मंदिराची माहिती सांगत होते, त्यांवरून जैन मंदिराचे या गांवात बर्‍यापैकी प्रस्थ असल्याचे जाणवत होते. मात्र आम्ही शंकराच्या मंदिराची माहिती विचारल्यावर 'पुराना मंदिर....'म्हणून ओळखलं जाणारं मंदिर जरा उपेक्षितच असल्याचं लक्षात आलं.गांवातील मुख्य जैन मंदिराजवळून पुढे गेल्यावर गांवाबाहेर एका कुंपण घातलेल्या शेतात हा मंदिरसमुह आहे. गेट उघडंच होतं, त्यांतून आंत शिरून शेताच्या बांधावरुन या समुहापाशी आलो.
मुख्य मंदिराच्या डावीकडील २ मंदिरे अत्यंत भग्नावस्थेत आहेत. हा जर पंचायतन समूह असेल तर उजवीकडील २ मंदिरांचा मागमूसही दिसत नाही. आवारातील १ ल्या मंदिराचं छप्पर व गाभारा साफ ढासळलेला आहे. मात्र शाबूत असलेल्या खांबांवरील व तुळईवरील कोरीव काम गतवैभवाची साक्ष देतात.

हे बहुधा पंचायतनातील गणपतीचं मंदिर असावं, कारण मंदिराबाहेरच पोटावरील भाग गायब असलेली गणरायाची भग्न मूर्ती पहायला मिळते, पण अशाही स्थितीतील मूर्तीच्या डाव्या हाताची बोटे, पाय व उंदीर यांच्या घडणीतली सुबकता लक्षात येते.

२ रं मंदिरही छप्पर उडालेल्या स्थितीत आहे. गाभार्‍यामध्ये देवीची छातीपासून खालचा भाग नाहीशा अवस्थेतील मूर्ती आहे, पण प्रभावळीच्या रचनेवरुन मूळ स्वरुपातील रेखीव मूर्तीची कल्पना येऊ शकते.

गाभार्‍यातील वरच्या कोपर्‍यांत किर्तीमुखं कोरलेली आहेत.

संपूर्ण मंदिराचं छप्पर नाहीशा स्थितीत असलं तरी कोरीव खांब, तुळया व एकूण प्रमाणबद्धतेची कल्पना येते.

बाकी २ मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर बर्‍यापैकी अवस्थेत आहे. भूमीज शैलीचं शिखर असलेलं हे मंदिर ११ व्या शतकांतलं असावं. भूमीज शिखर स्थापत्त्यशैलीमध्ये, शिखर सुरु होते तिथल्या कोनाड्यापासून ते कळसाच्या भागापर्यंत मध्यभागी चटईसारख्या नक्षीची पट्टी असते व पट्ट्यांमधील जागेत छोट्या शिखरप्रतिकृतींचे थर असतात.

मंदिराच्या बाह्यांगावर सूरसुंदरींची शिल्पे आहेत. ही शिल्पे झिजलेल्या अवस्थेत असली तरी खिळवून ठेवतात.

हा समूह पाहून गेटमधून बाहेर पडल्यावर जवळच एका चौथर्‍यापाशी विष्णू, गणपती यांची भग्न शिल्पे ओळीने मांडून ठेवलेली दिसली. या गांवात आणखीही मंदिर/ शिल्पं असणार, पण मूळ कार्यक्रमांत अचानकपणे हा शिल्पपसारा शिरल्यामुळे आमच्याकडे वेळ कमी होता व प्रवासाचा पल्ला लांबचा होता, त्यामुळे पुन्हा कधीतरी शांतपणे हे बघायला यायचं ठरवून परतीचा प्रवास धरला. रात्री ९ वा. नासिकला परतलो.

Thursday, August 19, 2010

भंभागिरी - १५ ऑगस्ट २०१० भाग १

'सकाळी सहाऐवजी साडेसहाला हुतात्मा स्मारकाबाहेर जमायचे आहे' राहुलचा रात्री मेसेज मिळाल्यावर सुट्टीची साखरझोप अजून अर्ध्या तासाने वाढली. पहाटे खुडबुडत सॅक भरून अशोकस्तंभावर गाडी लावली. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, २६ जाने. यादिवशींच्या पहाटवेळांत खूप वेगळं चैतन्य असतं, त्यापैकीच एक १५ ऑगस्टचीही असते. एरवी दिसतात ते पोटार्थी (म्हणजे पोटासाठी कामाला लागलेले आणि पोट कमी करण्यासाठी नाईलाजाने चालणारे/ धावणारे). लहान मुलांची झेंडावंदनासाठी कडक कपड्यांत शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. आमचंही, नाशिकच्या वैनतेय गिर्यारोहण-गिरीभ्रमण संस्था आणि यंदाच्या गिरीमित्र संमेलनावेळी स्थापन झालेल्या दुर्गभरारी संस्थेतर्फे झेंडावंदन ठरलं होतं ते आडबाजुला असलेल्या धुळे जिल्ह्यातल्या भामेर दुर्गावर. ७ वा. ७ भिडू घेऊन आमची टवेरा एकदाची निघाली. वाटेत वडाळीभोईला जैन हॉटेलात मिसळ, भजी, पेढे आणि चहाचं पेट्रोल भरून निघालो तोवर साडेआठ वाजत आले होते.

आता कुठेही टीपी न करता थेट साक्रीला पोहोचणे होते. वाटेत चौल्हेर, डोलबारी रांग, पुढे मांगी- तुंगीची सेलबारी रांग, उजवीकडे पिसोळ- डेरमाळ दुर्गांची रांग डोंगरटोके उंचावत साद घालत होती.साक्री- नंदुरबार रस्त्यावर भामेर किल्ल्याकडे जायचा फाटा लागतो. नाशिक ते भामेर गांव १८० किमी. अंतर आहे. गांवात शिरल्याबरोबर प्रवेशद्वाराचं गतवैभव दाखवणार्‍या कमानीने लक्ष वेधून घेतलं. या कमानीच्या बाजूलाच बारव आहे. बाजूलाच भल्या थोरल्या डोणी आहेत आणि अजूनही वापरात आहेत.

भग्न प्रवेशद्वारामागील नक्षी कोरलेले ८-९ फूट उंच खांब देखणे आहेत. पैकी एका खांबाचं फिनिशिंग एक्दम ग्रॅनाईटप्रमाणे गुळगुळीत आहे. जवळच एका जुन्या मशिदीचेही पडके अवशेष दिसतात.

एका मुलाने गाडी किल्ल्याच्या पायथ्याकडे असलेल्या शिवमंदिरापर्यंत जाईल असं सांगितल्यामुळे गांवातले अवशेष नंतर बघायचं ठरवून गाडी अरूंद बोळांतून शेवटपर्यंत दामटवली. साडेअकरा वाजत आले होते. दोघेजण बरोबर घेतले आणि चढाईला निघालो. भामेर दुर्गाच्या डोंगराचे ३ भाग आहेत. गांवात घुसलेल्या डोंगरसोंडेवर पांढरा रंग दिलेली पिराची घुमटी आहे. या पीराला पांढर्‍या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. मधल्या टेकडीच्या पोटाच्या घेराशी खोदलेल्या गुहा-टाकींचा पट्टा आवळलेला आहे. तिसरा सगळ्यांत उंच असलेला तो बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. पायथ्याशी असलेला खंदकाचा बुजत आलेला खड्डा ओलांडून १५ मिनिटांत पिराची टेकडी व मधल्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो. येथील प्रवेशद्वार ढासळलेलं असलं तरी दुतर्फा उभे असलेले उंच दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात. डावीकडे वळून पायर्‍या चढून वर आल्यावर शिलालेख कोरलेल्या भग्न कमानीचा आडवा झालेला तुकडा दिसला. इथून उजवीकडे जाणारी वाट गुहा कोरलेल्या टेकडीकडे जाते. या टेकडीच्या पोटांत रांगेने ही पाण्याची गुहा टाकी मोठ्या संख्येने खोदलेली आहेत. अरूंद पायवाटेने जात ती सगळी टाकी बघता येतात.

टेकडीला प्रदक्षिणा घालत सगळी टाकी बघून वर आलो आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. इतक्या प्रचंड संख्येने गुहाटाकी दुसर्‍या कुठल्याही किल्ल्यावर नसतील. बालेकिल्ल्याकडे जातांना मध्येच कातळ कापून खाच पाडल्याने हा भाग थोडा विलग झाला आहे. या खिंडीत पायर्‍या आहेत. इथून पुढे पायर्‍यांच्या वाटेने चढतांना आणखी एक प्रवेशद्वार लागलं. इथे डावीकडे रचीव दगडांचा बुरूज आणि उजवीकडे रचीव तटबंदी दिसली. वर आल्यावर सतीमातेच्या छोट्याशा मंदिराच्या डावीकडे वळून टोकाकडे जाऊन पलिकडचा देऊरचा डोंगर पाहून परत फिरलो.

या डोंगरावरही काही लेणी आहेत. पूर्वेला जुळे सुळके दिसतात, ते रवळ्या- जवळ्या नांवाने ओळखले जातात. (रवळ्या-जवळ्या हे सातमाळा रांगेतले २ किल्ले वेगळे).

मंदिराची जागा झेंडावंदनाला योग्य होती. मंदिराच्या शेजारी खोदीव टाके आहे.



झेंडावंदन व राष्ट्रगीत झाल्यानंतर उतरतांना मधल्या डोंगराच्या पोटात असलेली लेणी वाटेतच दिसली. तिनही द्वारांच्या चौकटींवर नक्षी आहे. पहिल्या द्वाराच्या उंबर्‍याकडे दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. शेजारीच भली मोठी कोठाराप्रमाणे वापरली जात असावी अशी गुहा खोदलेली आहे. सध्या त्यांत पाणीच साठलेलं आहे. इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. उतरायला लागून वीसेक मिनिटांत परत गाडीकडे पोहोचलोसुद्धा. गांवातच दक्षिण भारतीय घडण वाटावी अशा एका मोठ्या नंदीची भग्न मुर्ती दिसली. त्याला लागूनच नक्षी असलेला खांबही आडवा झालेला आहे.

पूर्वी इथे मंदिर असावं. गांवात ठिकठिकाणी तटबंदीचे, विविध नक्षीं कोरलेल्या भग्न दगडांचे अवशेष दिसतात.

महाभारत काळांत भामेरचं नांव भंभागिरी असावं. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने भामेरला अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला, अशी दंतकथा.गडावरील लेणी- गुहांवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. लेणी असल्यामुळे भामेरजवळून प्राचिन राजमार्ग जात असावा. १२ व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. देवगिरीच्या सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. इकडे यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनींच्या काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होता. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढार्‍यांच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ. ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले. गांवाबाहेर एका वडाच्या झाडाखाली पोटपुजा केली आणि जवळच असलेल्या आणि अचानकपणे गवसलेल्या, प्राचिन ठेवा असलेल्या गांवाकडे गाडी वळवली.... (क्रमशः)

संयोजनः वैनतेय गिरीभ्रमण, नासिक
सहभागी: राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, सुदर्शन कुलथे, पी.के. पाटील, हेमंत देशमुख, नील माहिमकर, अनुपम कामत

Sunday, July 18, 2010

एक सकाळ फळाफुलांची..

नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री. धर्मेश त्रिवेदी यांचं 'हेल्थकेअर फुड अँड ज्युस' नांवाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. राहुल सोनवणेनं फोनवरून, खंडोबाच्या टेकडीवर जाणार असशील तर या ठिकाणी आवर्जून जायला सांगितलं होतं. तसं देवळाली कँपमध्ये 'भारत कोल्ड्रिंक्स' कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्रिवेदींचं हेल्थकेअर फुड- ज्युस सेंटर, बाहेरून बाकी सामान्यपणे ज्युस सेंटर असतं तसंच..! ..बाहेरच मांडलेल्या खुर्चीवर बसून मेनुकार्डवर नजर फिरवतांना नेहमीच्या सवयीप्रमाणे वेगळं काही ढोसणेबल आहे कां ते बघत असतांना एकदम कोकोनट मिल्कच्या म्हणजे नारळाचं दुधाच्या कॉलमपाशी थबकलो. खवलेलं ओलं खोबरे वाटून पिळल्यावर जो रस निघतो तो म्हणजे नारळाचं दुध. नारळाचं दुध आतापर्यंत उकडीच्या मोदकांबरोबर, तांदळाच्या शेवयांबरोबर, कैरीच्या आमटीत, पुरणपोळीबरोबर,सोलकढीत अशा सपोर्टिंग पोझिशनला चाखलेलं, ...पण डायरेक्ट मेन रोलमध्ये पेयांत? .. त्यांतही प्रकार , म्हणजे १) प्लेन नारळाचं दुध २) नारळाचं दुध आणि गुलकंद ३) नारळाचं दुध आणि खजूर ४) नारळाचं दुध आणि चॉकलेट ५) नारळाचं दुध आणि अंजीर.
याशिवाय मुगाच्या आणि मक्याच्या पोह्यांचे चाट आणि वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस हेही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. येथील ज्युसचं वैशिष्ट्य म्हणजे साखर कशातही घालत नाहीत, त्यामुळे फळाची मूळ चव जीभेवर येते. पार्सल देतांनाही ग्राहकाला १ तासाच्या आत ज्युस संपवण्याची सूचना त्रिवेदीजींनी दिलेली मी ऐकली. ऑर्डर द्यायला काउंटरवर पोहोचताच प्रसन्न व हसतमुख अशा धर्मेश त्रिवेदींशी बोलतांनाच डाव्या हाताला लक्ष गेलं. काउंटरवरच ठेवलेल्या टेराकोटाच्या पसरट भांड्यात पिवळीजर्द कण्हेर व जरबेराच्या फुलांची रांगोळी रेखीवपणे मांडलेली दिसली. ..अक्षरशः खेचला गेलो!

..समोर साईबाबांच्या प्रतिमेच्या पुढ्यातही वेगळी पुष्परचना मांडलेली होती. भराभर फोटो काढले.

त्रिवेदीजी आणि त्यांचे मदतनीस गालात हसत माझा हा उद्योग बघत होते. पोटोबा झाल्यानंतर पुन्हा मी फुलांच्या सजावटीकडे वळालो. पण याबाबत काही छेडण्याआधीच त्यांनी छोटासा अल्बमच समोर ठेवला. पूर्वी वेगवेगळ्या रंगांचे धान्य वापरूनही ते विविध रांगोळ्या बनवत असत, पण त्यासाठी लागणारा प्रचंड पेशन्स आणि जाणवू लागलेला पाठीचा त्रास यामुळे धान्यरंगावलीचा छंद कमी केला. व्यवसायानिमित्ताने एकदा पाँडीचेरीला गेले असतांना मदर मेरीच्या समोर विविध पुष्पगुच्छांची केलेली आकर्षक सजावट मनाला भावून गेली. स्वतःच्या दुकानातही फुलांची अशी काही छोटी सजावट करता येईल असा निर्मितीविचार मनात घेउन रोज नविन काहीतरी वेगळी सजावट करता करता हजारो देखण्या पुष्परंगावल्या साकार झाल्या. सुरूवातीला नुसत्या फुलांची रांगोळी फुले लवकर सुकून जात असल्याने त्यांनी पाण्यावर फुलांची रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि आता ते विविध आकारांची छोटी भांडी वेगवेगळ्या आकारांसाठी वापरतात.

रानफुले असोत किंवा राजफुले असोत, त्रिवेदीजीं त्यांच्या सजावटीत प्रत्येक पाकळीला न्याय देतात. प्रत्येक फुलाचा रंग, आकार वेगळा त्यानुसार मांडणीत प्रत्येकाचं स्थानही उठावदार ठरतं.

त्यांच्या मोबाईलवर शेकडो सजावटींचे फोटो पहायला मिळतात आणि ते उत्साहाने दाखवतातही. त्यापैकी काही रचना...





साधारण २ दिवसांपर्यंत सजावट टिकून रहाते, त्यानंतर मात्र त्यांतील ताजेपणा उणावायला लागतो. मग एवढी मन ओतून केलेली सजावट मोडतांना इमोशनल अत्याचार होत नाही कां? या माझ्या शंकेवर स्मित करत त्यांनी उत्तर दिलं '..जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'क्या बात है!
ज्युसमध्ये घालायच्या साखरेचा सर्व गोडवा त्रिवेदीजींच्या जीभेवर पसरला आहे. निघतांना त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड मागितल्यावर पुन्हा साखरेची उधळ्ण झाली - 'आप जैसे मित्रही मेरे व्हिजिटिंग कार्ड है. इसलिये मुझे उसकी जरुरत नही लगती.' एकशे एक टक्के खरं आहे!!!

Friday, July 16, 2010

खंडोबाची टेकडी

खंडोबाची टेकडी हे ठिकाण माहित नाही असा माणूस नासिकमध्ये विरळाच! नासिकपासून १५ किमी. वरील देवळाली कॅंप भागात असलेली ही टेकडी स्वच्छ, मोकळ्या हवेमुळे व निरव शांततेमुळे प्रसिद्ध आहे. देवळालीतून निघाल्यावर काही मिनिटांतच टेकडीजवळ पोहोचायला होतं.हा संपूर्ण भाग सैन्याच्या ताब्यात असल्याने पायथ्यापाशी जवान उभे असतात. पायथ्यापाशीच डावीकडे एक तोफ दिसते. चढाईच्या सुरूवातीलाच या ठिकाणाबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्यांत या टेकडीचा विश्रामगड आणि शिवाजीमहाराजांच्या या टेकडीवरील वास्तव्याचा चुकीचा उल्लेख आहे. खरं तर विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला व महाराजांचं वास्तव्य पट्टा किल्ल्यावर होतं. असो. टेकडी चढतांना रूंद व कमी उंचीच्या पायर्‍या असल्याने दमछाकही फारशी होत नाही. टेकडीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे. माथ्यावरील घुमटाकृती खंडोबाच्या मंदिराला आटोपशीर तट आहे.




मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...



..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.



गाभार्‍यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.

अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...

Thursday, May 27, 2010

मिसळ

कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.

स्वतःला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथे हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जातांना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणावून टाकणार्‍या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. 'पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा.कारण तुम्ही कुठेही कोपर्‍यांत बसला असाल तरी तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते' असे पूर्वीचे लोक म्हणत, त्यांवरून जर मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.

मिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, अशी hotel किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्‍या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.

मिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री! 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां!) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. काही ठिकाणी हंगामात कैरीच्या बारीक फोडीही वरुन घालतात. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं! हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं! त्यापेक्षा भोपळयाचे घारगे केले तर किती दणादण संपतात!
मिसळीबरोबर घट्ट नातं आहे ते पावाचं.. अमुक एका ठिकाणी तर स्लाईस ब्रेड मिळतो म्हणून तिथल्या मिसळीकडे पाठ फिरवणारी मंडळी आहेत इतकं पावाचं महत्त्व मिसळीसोबत आहे. पण हे काहीही असलं तरी पहिला मान मिसळीचाच.. मिसळ समोर आली की थेट पाव मोडून रश्शात बुडवण्याआधी नुसत्या मिसळीचे दोन चमचे चाखून बघा. त्याचे कारण म्हणजे पावामुळे मिसळीची मूळ चव बरेचदा लक्षात येत नाही. नुसतंच उदरभरण होतं. आम्हांला काही ठिकाणी तर उसळीला आंबूस वास यायला लागलाय हे केवळ या सवयीमुळे लक्षात आलेलं आहे. बाकीचं पब्लिक मात्र मजेत खात होतं, कारण फुल्ल तर्री-रस्सा-पाव आणि गप्पा यामुळे तो किंचित आंबूसपणा लक्षात येत नव्हता. म्हणून पहिले दोन चमचे नुसत्या मिसळीचे खा, मग समजेल मामलेदार कचेरीच्या मिसळीतली उसळ किती चवदार असते आणि दिवसभर तिथला घाणा कां सुरु असतो ते..!
ट्रेकर्स मंडळींचे नि मिसळीचे एक वेगळे भावानुबंध आहेत. सह्याद्रीत सक्काळी कुठल्याही दुर्गपायथ्याच्या मोठ्या गांवात जाऊन पडलात तरी मिसळ ही मिळणारच आणि ती एकदा चापली की दुपारच्या जेवणापर्यंत निश्चिंती असते. कैकदा तर आख्खा ट्रेकही मिसळ तारुन नेते. ट्रेकच्या फोटोंमध्येदेखील आधी मिसळीचा फोटो आणि मग किल्ल्याचा पायथ्याकडून घेतलेला फोटो असतो इतका मान मिसळीचा आहे. या मंडळींची कुठल्या गांवात कुठल्या हाटीलात किंवा गाडीवर मिसळ चांगली मिळते या विषयावर पीएचडी असते आणि चांगल्या ठिकाणांची प्रसिध्दीही हेच लोक जास्त करत असतात.
'येथे ट्रेकर्सना सवलतीच्या दरात मिसळ मिळेल' अशा पाटीच्या आम्ही शोधात आहोत... :)

(हा लेख लोकप्रभा ऑक्टो. २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)

Monday, March 15, 2010

घनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड


जलाशयांची रेलचेल असलेल्या लोणावळ्याच्या आसपास मुक्कामी डोंगरयात्रा करणार्‍यांना पर्वणी असलेले किल्ले आहेत, त्यापैकी लोणावळ्याहून ३०-३५ किमी. वर असलेल्या घनगड- तेलबैलाची रांग कित्येक दिवसांपासून चिन्मय व माझ्या डोक्यात होती.
प्रचि १

प्रत्येक ३ दिवसांच्या जोडून आलेल्या सुट्टीसाठी ही रांग आमचा पहिला ऑप्शन असे व काहितरी कारणाने दरवेळी तो बारगळतही असे. शेवटी या वर्षी शुक्रवारी आलेल्या महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून चिन्मयने ट्रेकचं सगळं प्लॅनिंग केलं. आमच्या वैनतेय संस्थेचा २ वर्षांपुर्वी घनगड-तेलबैला- कोरीगडचा ट्रेक झाला होता तेव्हाची बहुतेक मंडळी आमच्या ट्रेकच्या सवाष्णी घाट व सुधागडच्या extra premiumमुळे लाळ गाळू लागली.सरतेशेवटी ती मंडळी आमच्यानंतर १ दिवस उशीरा निघुन सुधागडावर आम्हाला गाठणार असं ठरलं. नकटीच्या लग्नाचं सतराशेवं मोठं विघ्नं म्हणजे या ट्रेकची बांधणी करणारा आमचा हिरोजी, 'चिन्मय' ट्रेकच्या २ दिवस आधी त्याच्या बँकेतील महत्वाच्या कामामुळे गळाला. पोटासाठी माणसाला तंगडतोड करावी लागते, पण इथे पोटासाठी तंगडतोडीला ब्रेक लागला होता. सरतेशेवटी नाशिकहून मी एकटा तर पुण्याहून दुर्गेश व सत्यजित असं त्रिकुट आणि लोणावळ्याला एकत्र येणे... ठरलं!
पहिला दिवस
मी कसार्‍याहून सकाळी ६.१०ची लोकल पकडून ७.३० ला ठाणे, तिथून ८.१० ची डेक्कन पकडून पावणेदहाला लोणावळ्यात पोहोचलोसुद्धा! ठाण्याला चिन्मय शोलेतल्या हात कापलेल्या ठाकुरसारखा चेहरा घेउन भेटायला आला होता. लोणावळा शहर म्हणजे अजब रसायन आहे. ५० रू. साठी १०-१५ किमी. पायपीट करून मध, खवा वगैरे आणणारे आदिवासी इथे आहेत तर दिवसाला ५ अंकी रक्कम उडवत फिरणारी मंडळीही आहेत. विरोधाभासाचं उत्तम उदाहरण म्हणजे दिवसाला रहाण्याचं तिसेक हजार रू. भाडं असलेल्या अँबी व्हॅलीपासून अवघ्या १२-१५ किमी वरील तुंगवाडीसाठी लोणावळ्याहुन दिवसाला फक्त एकच बस (संध्या. ४) आणि जवळपास तेवढ्याच अंतरावरील भांबर्ड्यासाठीही २ बसेस (दु साडेबारा व साडेचार).
दोन तास वाट पाहिल्यावर पुण्याची जोडगोळी आली. बसस्टँडच्या बाजूला असलेल्या जोशांच्या अन्नपुर्णामध्ये मस्तपैकी जेवलो. साडेबाराची भांबर्डे बस जवळपास भरली होती. पाउण वाजून गेला तरी बस हलण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा तेलबैलाला जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या तरूण चमुतील एका ज्येष्ठाने खास पुणेरी भाषेत कंडक्टरला सोलल्यावर गाडी हलली. कोरीगडाच्या पेठ शहापुरपर्यंत म्हणजे अँबी व्हॅलीपर्यंत रस्ता हेमामालिनीच्या गालासारखा असल्याने लागलेली डुलकी पुढे ओमपुरीच्या गालासारख्या सुरू झालेल्या खड्डेबाज रस्त्यामुळे भंगली. आंबवण्यानंतर बर्‍यापैकी जंगलझाडी सुरू होते ती थेट सालटर खिंड ओलांडून तेलबैला फाट्याला लागेपर्यंत. सालटरच्या बसस्टॉपच्या शेडमध्ये हागणदारीमुक्त गांव योजनेचा मजेदार स्लोगन दिसला.
" सालटर ते आंबवणे पेरला आहे लसूण. संडास नाही बांधला तर राहिन मी रूसून..!" स्मित
तेलबैलाच्या जुळ्या भिंताडांचं प्रथमदर्शन भेदक आहे. तेलबैला फाट्यापासून तेलबैला गांव चारेक किमी. तर भांबर्डे सरळ तेवढ्याच अंतरावर. भांबर्ड्यात उतरल्यावर समोर नवरा- नवरी- करवलीचे सुळके दिसतात.
प्रचि २

उजवीकडे दुसर्‍या टोकाला ठेंगुटका घनगड सुटावल्यामुळे ओळखता येतो.भांबर्ड्यातून येकोले वस्ती गाठायला अर्धा तास लागतो. घनगडाच्या शेजारील उंच डोंगराचे नांव कुणाही गांवकर्‍याला सांगता आले नाही किंवा नांव माहित असलेला आम्हांला भेटला नाही- येकोल्यातलं हनुमानाचं उघडं मंदिर मुक्कामयोग्य आहे.येकोल्यातून दाट झाडीत लपलेल्या गारजाई मंदिरात पोहोचायला २० मि. लागतात. गाभार्‍याच्या डाव्या भिंतीवर देवनागरी शिलालेख आहे. "श्री गारजाई माहाराजाची व किले घनगडची". हा महाराज कोण? .. माहित नाही. मंदिरासमोर दिपमाळ आहे. तिच्या पायथ्याला काही शिल्पे आहेत. बरोबर पुरेसे पाणी असेल तर हे मंदिर ७-८ जणांसाठी बरं आहे.
प्रचि ३

मंदिरातून घनगडावरील जोडगुहेत पोहोचायला विसेक मिनिटे लागतात. वाटेत ढासळलेलं प्रवेशद्वार लागतं. डावीकडच्या गुहेत थोडी सपाटी असल्याने तिथे सॅक्स ठेवल्या. उजवीकडे एक मोठा शंभरेक फुटी उंच शिलाखंड कड्याला रेलून उभा असलेला दिसतो.
प्रचि ४

त्या मधल्या जागेत देवी वाघजाईचं स्थान आहे. मूर्ती सुबक आहे. आणखी थोडं पुढे सध्या पिणेबल पाणी असलेलं गडावरील एकमेव टाकं गाठून तळाला गेलेलं पाणी भरुन घेतलं. गुहांच्या डावीकडे माथ्यावर जायची वाट आहे. इथे १५ फुटांचा पॅच आहे. सोपा आहे पण सेफ्टीसाठी ५० फुटी दोर जवळ हवा. माथ्यावर टाकी, दोन बुरुज, जोत्यांचे अवशेष आहेत. तेलबैला, सुधागड व वरून दिसणारा एकुणच परिसर फोटोजेनिक।
प्रचि ५

पेशवेकाळांत सदाशिवभाउंचा तोतया कनोजी ब्राह्मणाला घनगडावर कैदेत ठेवल्याचा उल्लेख सापडतो.खिचडीची तयारी करायचे असल्याने सुर्यास्त शो रद्द करून झटपट उतरलो. रात्री खिचडी, पापड, बायकोने दिलेले अप्पे+चटणी वगैरे हादडून झोपलो. दोनेक उंदीर सारखे डोकावत होते. कदाचीत त्यांची बेडरूम आम्ही बळकावल्यामुळे त्यांची घालमेल झाली असावी. आम्हीही सावध होवून खाण्याचे पदार्थ सॅकमधून काढुन सुरक्षित टांगून ठेवले, नाहीतर वासाने उंदीर सॅक कुरतडतात..!
दुसरा दिवस
पहाटे गजर झाल्यावर तिघेही उठलो, पण एकुणच अंधार पहाता पुन्हा लवंडलो. सकाळी ८ वा. भांबर्ड्यातून थेट तेलबैला गांवात जायला बस आहे. थोडं रेंगाळतच आवरल्यामुळे ती चुकली. येकोल्यातून भांबर्डयाला न जाता शेताडीतून वाट तुडवत मोठा ओढा ओलांडून रस्त्याला लागलो. या ओढ्यात मार्चपर्यंत पिण्याचं पाणी असतं. तेलबैला फाट्यापासून गांवापर्यंतचा ३ किमी. चा डांबरी रस्ता चांगला आहे. तेलबैला गांवाचं location भन्नाट आहे. इथल्या जुळ्या भिँतीँचा निसर्गाविष्कार जगांत कुठेही नाही.
प्रचि ६

डाव्या भिंतीवर पायर्‍या, गुहा वगैरे किल्ल्याचे अवशेष आहेत. गांवात जास्त वेळ न काढता चिंधू लक्ष्मण मेणेमामांना बरोबर घेतलं व तेलबैलाच्या गांवात उतरलेल्या सोंडेवर स्वार होऊन उजव्या भिंतीस उजवीकडे ठेवत अर्ध्या तासांत मधल्या खिंडीत पोचते झालो. खिंडीत डाव्या भिँतीच्या पायथ्याला भैरवाचा तांदळा, गार पाण्याचं टाकं आहे.
प्रचि ७

माथा गाठायचा प्रस्तरारोहण मार्ग बोल्ट्स ठोकलेले दिसत असल्याने ओळखू येत होता. खिंडीतून सुधागड माथा दिसत होता. आता मामा हाताशी असल्याने आमच्या मनांत ठाणाळे लेणी पहाण्याची कातील योजना चालू झाली. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही सवाष्णी घाटाने उतरणार होतो. या मार्गे ही लेणी वळसा व वेळ घेतात असं ऐकलेलं, पण वाघजाई घाटाने उतरलं तर बरं असं बर्‍याच जाणकारांकडून ऐकल्यामुळे आम्ही वाघजाईची वाट निश्चित केली. एव्हाना साडेअकरा वाजले होते. तेलबैला उतरल्यावर साधारण अर्धा तास घाटधारेवर यायला लागतो.
प्रचि ८

उतरायला सुरुवात केल्यावर लगेच वाघजाई देवीचं देऊळ लागलं. देवळांत ७-८ मुर्त्या ओळीने मांडून ठेवल्या आहेत. त्यांतली वाघजाई नेमकी कुठली याचा विचार करायला सवड व डोके दोन्हीची वानवा असल्याने नमस्कार करून पुढची वाट धरली. ऊन्हाने आसमंताचा पुर्ण ताबा घेतलेला.. पाणी अजून तरी मुबलक होते. मध्येच मामाने जाहीर केलं की लेण्यांकडे उतरणारी वाट बहुतेक बुजली आहे व आपल्याला पुढे जाऊन वळसा मारून उतरतच लेणी गांठावी लागणार आहेत. ह्या वळशाच्या ढोरवाटेने आमच्या तोंडाला चांगलाच फेस आणला. सकाळी उठल्यापासून पोटांत पाण्याशिवाय का sssही नव्हतं! लेण्यांत पोहोचेपर्यंत पावणेतीन वाजलेले.
प्रचि ९

या हीनयान लेण्यांचा खोदकाल भाजे लेण्यांच्याही आधीचा म्हणजे इ.स्.पू. २ र्‍या शतकांतला आहे. इथे प्रथमच मौर्यकालीन (अशोक) चांदीची नाणी सापडली आहेत. या लेण्यांचा नव्याने शोध मिशनरी जे. अ‍ॅबट यांना जाने. १८९० मध्ये लागला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही काही काळ या लेण्यांचा आश्रय घेतला होता.
प्रचि १०

लक्ष्मीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत, त्या अर्थाने जुने 'श्रीस्थान'. पांडवलेण्यांच्या शिलालेखांतील सिरीटन म्हणजे श्रीस्थान म्हणजे ठाणाळे असा एक तर्क आहे. १९५४ मध्ये राष्ट्रीय पुरातत्व वास्तू म्हणून संरक्षित. एकुण २३ विहार आहेत. २ ब्राह्मी शिलालेख आहेत.
प्रचि ११

कमानींवरील विविध प्राण्यांची शिल्पे अप्रतिम आहेत. पैकी मोठे नागशिल्प पहाण्याजोगे आहे.
प्रचि १२

अनेक स्मारकस्तूप असलेली एक गुंफा आहे. लेणी पाहील्यावर झटपट मॅगी करायचं ठरवलं तर मामाने आणखी एक बॉम्ब टाकला.' आता पाणी खाली बेहरामपाडयाशिवाय कुठेही नाही. असलं तर खालच्या ओढ्याला!'. तिघांचीही तपासणी घेतली तर मोजून २ लि. पाणी होते. पैकी दिड लि. मध्ये मॅगी केली. गरम आहुती पोटात जातांच डोळ्यांच्या झापडांनी हट्ट सुरु केला. त्यांना न जुमानता अर्ध्या लि. पाण्याचे रेशनिंग करायचे ठरवून निघालो. १०० पावलांवरील ओढयामध्ये बारीक धार असलेलं पाणी दिसताच आम्हांला झालेला आनंद कसा असेल हे केवळ ही स्थिती भोगलेलेच अनुभवू शकतील. बाटल्या फुल्ल करून निघालो. जंगलातली वाट असली तरी कोकणातला उष्मा गोंजारुन हैराण करत होता!
प्रचि १३

साधारण पाउण तास चालल्यावर वरच्या बाजूला आवाज ऐकु आले, तेवढ्यात मामा म्हणाला, हा सवाष्णीचा घाट. आवाजही दुसर्‍या दिवशी निघालेल्या आमच्या मंडळींचे होते. आमच्या दुर्गेशने सरळ लोळण घेतली व आता त्यांच्याबरोबरच पुढे जायचं जाहीर केलं. पाउण तासात वरची मंडळी झटपट खाली आली. पाच वाजलेले. ते १४ व आम्ही ३ अशा १७ जणांना सुधागडमाथ्यावर नेण्याची जबाबदारी मामांनी घेतली व खाली गांवात न जाता एका आडवळणाच्या वाटेने आम्ही निघालो.
प्रचि १४

सुधागडाच्या पायथ्याला भोज्ज्या करेपर्यंत अंधारलं. मावळतीकडे सरसगड उंचावलेला दिसत होता.
प्रचि १५

कासारपेठ मारुती व तानाजी टाकं मागे टाकेपर्यंत पूर्ण अंधार झालेला होता आणि आम्ही, त्या शिलाखंडांच्या राशींवरुन धडपडत, एकमेकांना सावरत महादरवाजात आलो. त्या मिट्ट अंधारातही सुधागडाच्या त्या महादरवाजाचं भव्य वैभव जाणवत होतं. गार वार्‍याने माथा आल्याची जाणीव दिली. गडदेवता भोराईच्या देवळांत दुसरा ग्रुप असल्याने आम्ही आणखी थोडं पुढे पंतसचिवांच्या वाड्याकडे गेलो. चौसोपी वाड्यातल्या सारवलेल्या ओसरीवर सॅक ठेवतांनाच सगळा थकवा पळुन गेला होता. वाडा मोडकळीला आलेला असला तरी गतवैभवाची जाणीव होत होती.
प्रचि १६

सकाळी पावणेसात ते रात्री ९ अशा बेभान तंगडतोडीने आमचाही पायांवरचा विश्वास दुणावला होता. त्यांच्या मागणीप्रमाणे आमच्या राहुल वस्ताद व भाउसाहेबांनी बनवलेला गरम गरम कांदा-बटाटा रस्सा व भात ओरपला. शेकलेल्या पोटाने चढलेल्या गुंगीला शरण जात झोपी गेलो....
तीसरा दिवस
गडावरच वस्ती करुन रहाणारी पाच्छापुरातली २-३ घरे आहेत. मामाने त्यांच्याकडून तांब्याभर धारोष्ण दुध आणलं. झटपट चहा-भिस्कुटं खाऊन गडफेरीला निघालो. सुधागड डोंबिवलीच्या ट्रेकक्षितिज ग्रुपने दत्तक घेतलाय. ओसरीवरच किल्ल्याची माहिती व नकाशा असलेले २ फ्लेक्स आहेत. वाडयाशेजारीच एक खोल चौकोनी विहिर व महादेव मंदिर आहे.
प्रचि १७

वाडयापासून श्रीभोराईदेवीमंदिरापर्यंत पाखाडी बांधलेली आहे. भोरच्या पंतसचिवांची ही कुलदेवता आहे.
प्रचि १८

मंदिराच्या भवताली अनेक समाध्या दिसतात. नवरात्रांत गडावर उत्सव असतो. सभामंडपात वाघाची मूर्ती व जुनी मोठी घंटा आहे. समोर हत्तीने पाठीवर तोलून धरल्याची रचना असलेली दिपमाळ आहे. बाकी गडावर अनेक थडगी, अंबारखाना, २ तलाव व अनेक पडीक अवशेष दिसतात. एका तलावात भरलेलं कुमुद फुलांचे संमेलन.
प्रचि १९

गडाची रचना इ.स्.पू. २र्‍या शतकांतच झाली असावी कारण परिसरातली ठाणाळे व खडसांबळ्याची लेणी त्याच काळांतली आहेत.१४३६ मध्ये बहमनी सुलतानांनी गड जिंकल्याचा उल्लेख. १७ व्या शतकाच्या मध्यांत मराठी राज्यांत दाखल झाल्यावर जुने भोरपगड नांव बदलून सुधागड ठेवण्यांत आले. सुधागडाचा महादरवाजा थेट रायगडाची आठवण करुन देतो.
प्रचि २०

मंदिरातले गुरव पाच्छापुरांतले होते. त्यांनी ठाकुरवाडीतून पालीला जायला सकाळी ११ नंतर दिडची बस असल्याचे सांगितले. गडफेरीमुळे ११ ची बस चुकणारच होती. ठाकुरवाडीच्या वाटेने उतरायला लागल्यावर सुरुवातीलाच गार पाण्याचे टाके आहे.
प्रचि २१

इथे बुरुजाचे अवशेष दिसतात. ठाकुरवाडीच्या वाटेवर हल्ली लोखंडी शिडी लावल्यामुळे पाउणएक तासांत गांवात उतरलो.
प्रचि २२

प्रचि २३

वाडीतून दोनेक किमी.वर पाच्छापूर आहे. गांवात आल्यावर समजले, इथून ८ किमी.वर पाली फाटयावर एका मोरीच्या बांधकामामुळे सर्व वाहतुक बंद झाली आहे. ११ वा. आलेली बस शेवटची होती व त्या ड्रायव्हरनेच गांवात ही बातमी सांगीतली होती. कोकणातल्या झापडवणार्‍या उन्हामुळे आधीच वैतागलेल्या मंडळींच्या परीक्षेचा हा क्षण होता, पण आमच्या भाउसाहेबांनी एका मोटरसायकलस्वाराला धरून फाट्यावर जाउन काम चालू असलेल्या ठेकेदाराचाच डंपर भाड्याने ठरवून आणल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात (की डंपरमध्ये) पडला.
प्रचि २४

फाट्यावरून भिरा- पाली बस पकडून पाली, मग बस नसल्याने व्हॅनने नागोठणे, पॅसेंजरने दिवा, मग डोंबिवलीत जेवण. मग ठाण्यातून तुफान स्पीड्च्या अमरावती एक्स्प्रेसने २ तास ५ मि. त नासिकरोड.
प्रचि २५

( हा लेख गिरीमित्र संमेलन 2012 च्या स्मरणिकेतही समाविष्ट केला गेला आहे.)