Thursday, February 18, 2010

चक्रमांकित सह्यांकन २००९.

'जसा भावला तसा लिवला' पध्द्तीचां ह्यां लिखाण आसां. कोनाचा नांव घेऊचा र्‍हवलां आसां, कोनांक कांय खट्कला आसांत तेंची हंयसरच माफी मागतंय आनि ज्यां कांय लिवला हां,.. तां गोड मानांन घ्यावा नि आमकां अशेच तुमचे वांगडा भटकत ठेवा ह्यां तुमचे चरणी गाराणां घालतंय म्हाराजां..!
*************
मुलुंडची चक्रम हायकर्स संस्था १९८३ पासून दर २ वर्षांनी सह्याद्रीरांग परिसरात ५ दिवस मनसोक्त भटकण्यासाठी 'सह्यांकन' मोहिम आयोजीत करते. या वर्षी सह्यांकनचा मार्ग होता, मोरोशीचा भैरवगड-नळीच्या वाटेने हरिश्चन्द्रगड- शिरपुंज्याचा भैरवगड- घनचक्कर- रतनगड. एवढा भन्नाट चान्स कोण सोडेल?..............
सह्यांकनबद्दल अधिक माहितीसाठी...
http://www.chakramhikers.com/activities/major.html
*************

आमच्या ५ व्या बॅचचे लिडर्स- विनय नाफडे व विनय कुलकर्णी
आमच्या ५ व्या बॅचमधील सहभागी- १.चिन्मय देशमुख २.गौरव भिडे ३.मकरंद देशपांडे ४.निखिल फडके ५.स्वप्निल आवटे ६.अविनाश आवटे ७.योगीराज माने ८.प्रणव नाफडे ९. अमित पराडकर १०.हेमंत पोखरणकर ११.शील फडके १२.प्रकाश वाणी १३.प्रमोद वाणी १४.रविराज वाणी १५.श्रीकांत शिरूडे १६.सुधिर कुलकर्णी १७.केतन केतकर १८.प्रणव हसबनीस १९. विनायक पाटील २०.स्वर रवेशिया २१.रोहित २२.अंकित... ज्यांची नांवे नाहित त्यांनी add करा.

आमच्या ५ व्या बॅचची वैशिष्ट्ये- १) एकही मुलगी नाही.. त्यामुळे होल वावरांत आमचाच वावर..! २) १५ ते सत्तरी ..सर्व वयोगट ३)सर्व ठिकाणी वेळेआधी पोहोचली. ( १ ली बॅच सोडून सर्व बॅचेसना असंच सांगीतलं असेल कां??..)

*************

दि. २५.१२.२००९ शुक्रवार

नासिकहून आम्ही तिघे मी, स्वप्निल व अविनाश संध्या. निघून रात्री ८ वा. मुलुंडला पोहोचलो.पुण्याहून आलेला योगीराज भेटला आणि आमचा कोरम पूर्ण झाला...आमचा लिडर विनय नाफडे उर्फ लांबा... बरोब्बर ९ वा. बस निघाली... टोकवड्याच्या पुढे hotel शेवंतीमध्ये चहा. (आमचा एक पी.जे. - say one tea = शेवंती). रात्री १२ वा. मोरोशी छावणी..

स्वागताला आमचा दुसरा नेता विनय कुलकर्णी... या camp वर समीर कर्वे, नरेन्द्र तांबे आहेत... भैरवगडाच्या चढाईची तांत्रिक बाजू राजेश गाडगीळ, नरेन्द्र तांबे, सुशील देसाई व अंजु पनिकुलम सांभाळणार आहेत... ते तिघे भैरव माचीवर मुक्कामाला आहेत.

दि. २६.१२.२००९ शनिवार
५ वा. उठलो.. आवरुन ६ वा. जवळच्या हॉटेलमध्ये उपमा व चहा घेतला..सॅक्स खालीच ठेवून पावणेसातला चढाई सुरू.. तासाभरात भैरव माची गाठली.. एका बोल्डरनंतर भैरवगडाचे रौद्र दर्शन... माचीवर झोपडी..

राजेश, अंजू व सुशीलने प्रत्येकाला हार्नेस बेल्ट व स्नॅप बांधली..सूचना झाल्यावर भैरव व वर्‍हाड्याच्या डोंगरामधील खिन्डीकडे अर्ध्या तासात.. वाटेत थोडं वर २ खांबी गुहा टाकं.. नितळ पाणी.. प्रचितगडाची आठवण करून देणारं.. खिंडीच्या अलिकडे वर आणखी एक गुहा.. घसार्‍याची वाट.. खिंडीतून समोर भैरवची रौद्र कातळभिंत.. पायर्‍यांची नागमोडी वाट.. थोडं चढल्यावर वाटेत डावीकडे गुहेप्रमाणे जागा, त्या पॅचजवळ सुशील.. त्यावरच्या वळणावर राजेश.. ५ व्या दिवशीही पहिल्याच उत्साहाने सूचना व प्रत्येकावर काहितरी कॉमेंट करतोय.. तो जिथे उभा आहे, तिथे प्रत्येक बॅच आल्यापासून उतरेपर्यंत टळटळीत ऊन आहे.. अरूंद पायर्‍या व उजवीकडचा अंगावर झुकलेला कडा व डावीकडे खोल खिंड.. पायर्‍या संपल्यावर पुढे सर्व तुटलेलं.. हा वळसा म्हणजे भैरवचं दुर्गमत्त्व.. इथेच नरेंद्र तांबे ३ स्टेप्सची शिडी घेवून गेले ५ दिवस जवळपास १५० सहभागींना चढवत उतरवत बसलेला.. त्याच्या खांद्यांना कुठलं Lubricant लावलंय कोण जाणे! ..आता आमची बॅच झाल्यावर ही मंडळी वरपासून खालपर्यंत सगळं windup करून उतरणार आहेत.. वरची superfast batch घेऊन लांबा व अंजू माथ्यावर.. सगळे एकत्र झाल्यावर परिसर माहिती.. परतीला सुरुवात.. खिंडीत मस्त सरबत.. माचीवर जेवण्..स्नॅप्स जमा केल्या व बेल्ट्स जवळ ठेवले ते उद्या नळीच्या वाटेला वापरायचे आहेत..

भैरवचे सिंहावलोकन करून खाली हॉटेलात आलो.. चहा होईपर्यंत आम्हाला पुढे वोलिवरे गांवात घेउन जाणार्‍या जिप्स आल्या..अर्ध्या तासांत वोलिवरे गांव.. इथून कोकणकड्याचा नैसर्गिक रंगमंच खिळवून ठेवतो..

पाऊण तास कोकणकडयाच्या पायथ्यादिशेने चालल्यावर जंगलात लावलेला बेलपाडा कँप लागला..या कँपवर गोविलकरकाका.. मावळत्या सोनेरी सूर्य किरणांनी झळाळलेला कोकणकडा ... कॅंपवर तंबूत मुक्काम.. सूचना झाल्या.. चहा, कचोरी..दोन तासासाठी जनरेटर चालू रहाणार होता.. त्याचा आवाज खटकतोय... जेवायला वांगी-बटाटा, आमटीभात..स्स्स्स्स!! मस्त.. आमच्या स्वप्निलचा पी जे: "उद्या नळीच्या वाटेनं जायचंय, तर प्रत्येकानं आपापली नळी आणलेय कां?? "...
रात्री कोकणकडयावरून व कड्याच्या उजव्या बाजूने टॉर्चचा प्रकाश., त्याचे कारण उद्या समजेल!! थोडा वेळ जंगलगप्पा मारून झोपी गेलो.. झोपेत भैरवची कातळभिंत व सोनेरी कोकणकडा यांची काहितरी खिचडी...????
लांबाची आजची फटकेबाजी....(विनयच्या भाषेत Lamba's फेकॉलॉजी):
- गवताची काडी चावून तहान कशी भागवावी!
- 'पडलास तरी घाबरू नकोस.... मागचा पडतो!' (क्या लॉजिक है!)

दि. २७.१२.२००९ रविवार
ज्यांच्या पायांना ब्लिस्टर्स होते किंवा पायाची बोटे घासत होती त्या जागी टेप लावण्याचं मोठं काम सकाळी शंतनू पंडीतने हातात घेतलेलं..नाश्त्याला पोटभर पोहे.. पॅकलंच घ्यायचा होता... नळीच्या वाटेचा पहिला अडीच तासाचा टप्पा काळू नदीच्या उगमाच्या ओढयातील मोठे बोल्डर्स व दगडधोंडे यामधून आहे... पायथ्याशी उभे राहून कोकणकडयाची भव्यता निरखतांना शहारा येतो.. अर्ध्या पाऊण तासांत डावी मारून चढाई सुरू ठेवली.. फक्त चढ आणि चढ.. थोड्या वेळाने खडकाचं स्वरूप बदललं.. स्लेट्ससारखा खडक..

मुख्य नळीच्या घळीत ४ ठिकाणी सुरक्षित दोराची व्यवस्था होती.. पैकी २ ठिकाणी शिडी.. पहिले २ टप्पे झाल्यावर घळीला dead end.. इथून उजवीकडे ३ रा टप्पा चढून खडकाला वळ्सा मारायचा व ४ था टप्पा चढून नळीतून वर यायचं.. इथेच विनय व आशूची आठवडयाभरानंतर भरतभेट झाली...वर एको पॉईंटपाशी ५ वा सुरक्षित दोर.. वर छोटं पठार व पलिकडे झाडी.. इथे सरबत पॉईंट.. जेवण वाटेतच उरकून घेतलेलं.. झाडीतल्या जाम घसार्‍याच्या वाटेने वर आल्यावर पुन्हा ६ वा दोराचा टप्पा चढून वर थेट कोकणकड्याच्या कडेवर विसावलो..या सहाही टप्प्यांवर किती दिग्गजांनी आम्हांला सांभाळलं!!..सुदिप बर्वे, महेश केंदूरकर, अनिकेत चौधरी, शारंग थोरात, महेश कदम, शंतनू पंडीत, भाऊ गोगटे, मकरंद- रेश्मा बेडेकर, आशु साळवेकर, उदय पोवळे, वैभव इंगळे, वैशंपायन....!!!

कोकणकड्यावर त्या दिवशी Mountain Holidays या संस्थेने कोकणकड्यावरून डावीकडील खडकावर Valley crossing व Rappling camp घेतलेला आहे. त्यांचे लाईट्स काल रात्री आम्हांला दिसत होते. कोकणकड्यावर चिवडालाडू चहा घेऊन सूर्यास्त पाहून छावणीकडे आलो..

गणेशगुहेशेजारील साहेबाच्या गुहेत आमचा मुक्काम.. गेल्याबरोबर गरम सूप... जेवणाला छोलेपुर्‍या, कढीखिचडी, कोशिंबीर, नागली पापड!! ..(न आलेल्यांना जळवण्यासाठी ही मेनूलिस्ट् देतोय...दखल घ्यावी)....!! कालसारखा जनरेटरचा आवाज आजही..
लांबाची आजची फटकेबाजी....(विनयच्या भाषेत Lamba's फेकॉलॉजी):
- सॅकची डेन्सिटी कशी मोजावी- सॅक कशी भरावी..!
- कोणत्या रंगाची टोपी घातल्यावर फोटो चांगले येतात
- कॅमेर्‍याच्या बदलत गेलेल्या जनरेशन्स
- तुम्हाला माहित असलेल्या १०० विषयांपैकी मी ९८ विषयांवर बोलू शकतो.

दि. २८.१२.२००९ सोमवार
सकाळी आवरून हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन घेऊन निघालो. आज थोडा रेस्ट डे.. दिडेक तासांत पांचनईत उतरलो. लांबाने एका पेढे विकणार्‍या बाईकडून पेढे घेऊन प्रत्येकाला वाटायला सुरुवात केली होती.. बिनसाखरेचा ढ्ब्बू पेढा ५/- ..३ जीप्स तयार होत्या.

त्या आम्हांला आंबितला सोडून आमच्या सॅक्स शिरपुंज्यात छावणीवर उतरवणार होत्या.. पांचनईच्या ईशान्येला कलाडगड... राजूरकडे जाणारा पक्का गाडीरस्ता सोडून जीप्स डावीकडे कच्च्या रस्त्याला वळाल्या.. या रस्त्याने आंबित आठेक किमी. पडते व मोठा वळसा वाचतो मात्र या रस्त्याने ६ वळणे इतकी विचित्र होती की, प्रत्येक ठिकाणी जीप मागेपुढे करुन न्यावी लागत होती.. आंबितचं नविनच झालेलं ....नदीवरचं धरण. भिंतीजवळूनच जाणार्‍या रस्त्याने नदी ओलांडली.. आंबित.. आता फक्त पाण्याच्या बाटलीच्या हाताने भैरवचा पाउण तासाचा चढ चढायचांय..

खिंडीतून पायर्‍या केल्या आहेत.. ६-७ वर्षांपूर्वी चिन्मयबरोबर आलेलो तेव्हा या पायर्‍या नव्ह्त्या.. खिंडीत सरबत.. गांवकर्‍यांच्या व लिडरच्या सांगण्यावरून शूज खिंडीतच काढले त्यामुळे अनवाणीपणे मी प्रथमच किल्ला हिंडणार होतो..किल्ल्यावर भरपूर टाकी, खंडोबाचं गुहामंदिर (गुहेतील मुर्ती घोड्यावर बसलेली आहे. याला भैरवनाथ कां म्हणतात? जाणकारांनी शंका निरसावी), शिल्पशिळा व भरपूर बागडणारी माकडं... शिरपुंजे छावणीतून विंदा देशमुख व सुखदा बर्वेंनी आणलेला पॅकलंच..खिंडीतून शिरपुंज्यात उतरतांना अर्ध्यात डावीकडे घनचक्करला जाणारी वाट विनयने दाखवली पण हिच्यापेक्षा शिरपुंजे गांवातून चढणारी वाट अधिक सोपी आहे..गांवात मारूतीच्या प्रशस्त मंदिरात छावणी.. मस्तपैकी चहा, हसतमुख छावणी शिलेदारांशी म्हणजे दोघींबरोबरच माधव फडके, चंद्रशेखर दामले, विसुभाऊ कर्‍हाडकर यांच्याशी ओळख, झकास भेळ... त्यानंतर आजचा बिग बोनान्झा म्हणजे नदीवर धमालपैकी आंघोळ.. गरम सूप.. लांबाचं मॅनेजमेंट स्किलवर तासाभराचं उत्तम टॉकसत्र.. जेवायला जिराराईस, बटाटावडे-चटणी, मारूतीच्या पायाशी विनाव्यत्यय झोप..- what a day!!!
लांबाची आजची फटकेबाजी....(विनयच्या भाषेत Lamba's फेकॉलॉजी):
- उकडीच्या मोदकांची पाककृती..(अगदी तांदुळ कुठला घ्यावा इथपासून..!)
- one hr seminar on management skills..

दि. २९.१२.२००९ मंगळवार
लांबाचं चहावर काहितरी पहाटसत्र सुरू असतांना जाग आली.. आवरून सुर्योदयाचे फोटो, पॅकलंच, ओळखपरेड, सूचना वगैरे आटपेतो अंमळ उशीरच झाला..आज विनयची strategy थोडी चेंज.. बॅचमधील स्लो बॅट्समन रोहित व मकरंद यांना घेऊन तो पुढे होणार होता.. आमची चौकडी नेहमीप्रमाणे सगळ्यांत मागे, .. फुल जोक्स, टवाळ्या करत, त्यांत officially आम्हांला लांबा backbench leader मिळाला.. धमाल only! अवाढ्व्य पसरलेल्या घनचक्करबद्दल कुतूहल होतेच. शेंडीतुन रतनवाडीकडे जातांना घनचक्करच्याच कुशीतूनच तर रस्ता आहे.. कळसूबाई, साल्हेरनंतरचं तिसरं उंच मुडा शिखर घनचक्करवरच विसावलंय.. घनचक्करवर एकूण ३ शिखरं! घनचक्कर, मुडा आणि मार किंवा गवळीदेव..
साधारण दिडेक तासाच्या चढाईनंतर कळसूबाई रांग उजवीकडे सतत दिसत रहाते..तिन शिखरांना वळसा मारून कात्राबाई खिंडीत येईपर्यंत सह्याद्री इतकी नानाविध रूपं दाखवतो की कांयकांय घ्यावं! त्यांत या दिवसांत शिखरांना ढगांचं कार्पेट!..

पुढे रतनगड व खुट्टा सुळका सुरेख कोनांतून दर्शन देतांत्..पाणी पाहून जेवण आटोपलं .. जेवण झाल्यावर विनयने सगळया संपलेल्या जामच्या बाटल्या गोळा करून, पाणी भरून त्या त्या फ्लेवरचं सरबत बनवण्याची idea दाखवली..गवळीदेवाच्या डोंगराला डावीकडून वळसा मारतांना मागून शिरपुंज्यातल्या छवणीविरांनी तिकडची बांधाबांध आटोपून आम्हांला गाठलं देखिल! वळणं वळणं करत जातांना लांबवर कुणीतरी आजची कँपसाईट दाखवली.. वाह! बॅकग्राउंड्ला कात्रा डोंगर असलेली साईट एकदम कल्लास!!

साईट्च्या अलिकडे १५ मि.वर थोडं खाली जाऊन ओढ्यावर सेमीआंघोळ केली व कँपवर आलो.. अध्यक्षांनी रानफूल देऊन प्रत्येकाचं स्वागत केलं.. आपटेकाकांच्या प्रसन्न हास्यदर्शनाने दिवसभराचा शिणवटा दूर केलाच होता.. चहा तंबूवाटपानंतर आपटेकाकांनी भवतालच्या सर्व परिसराची व शिखरांची ओळख करून दिली.. अंधार होतांना सगळे एकत्र आले. संयोजनाविषयी तक्रारी ऐकल्या गेल्या... मला तक्रारीच्या सूरापेक्षा संयोजनावरची मेहनत जास्त भावली..सूचना, ट्रेक प्रमाणपत्र, स्मरणिका, ओळखपरेड, आटोपल्यावर जेवण.. उद्या शेवट्चा दिवस असल्याने या कँपसाईटवर पुरणपोळी-मसालेभाताचा पावणेर आमकां गांवला!.. रात्री चक्क पाउस, पण जास्त वेळ राहिला नाही.. टेंट चौघांना थोडा अपुरा पडला पण अ‍ॅड्जस्ट झालो.. good night!!
लांबाची आजची फटकेबाजी....(विनयच्या भाषेत Lamba's फेकॉलॉजी):
- खोकल्यावरील औषधाच्या श्लोकापासून मोरोपंतांच्या आर्यांपर्यंत सबकुछ..!


दि. ३०.१२.२००९ बुधवार
सकाळी उठल्याबरोबर पहिलं आकर्षण सुर्योदयाचं.. भंडारदरा भवतालाच्या कुठल्याही शिखरमाथ्यावरून सुर्योदय अनुभवणं विलक्षण आनंददायी असतं. आणखी एक वेगळं म्हणजे सुर्यकांतचं पी.टी. सेशन.. स्नायू relaxation साठी त्याने करवून घेतलेले प्रकार मस्त होते..आज शेवटचा दिवस म्हणून थोडी रूखरूख.. गेले ४ दिवस कसे गेले ते...(सगळं लिहिलंय.. उगाच सेंटी व्हायला नकोय!)
आवरून १० मि.त कात्रा खिंडीत उतरलो.. कात्राबाईचं ठाणं एका झाडाखाली.. या खिंडीपासून रतनगडापर्यंतची एकदिड तासाची जंगलातली चाल एकदम मस्त! या वाटेवरचं आणखी एक आकर्षण म्हणजे कात्रा डोंगराला लगटून असलेला अग्निबाण सुळका!

याच्या पायथ्याकडूनच आपण रतनगडाकडे सरकतो.. लांबा आमच्यातच असल्याने जोक्सना उधाण आलेलं! रतनगडावर जाणार्‍या वाटेआधी लागणार्‍या टाक्यातली तळाची पाणवनस्पती फोटोजेनिक.. रतनगडावरची गुहा पाहुन अग्निबाणाच्या दिशेकडील बुरूजाकडे.. गडावरील वास्तुविषयक व ऐतिहासिक माहिती देण्याची सर्व सुत्रं लांबाने घेतली होती.. आजोबा, बाण स्वच्छ वातावरणामुळे व्यवस्थित दिसत होते.. फटाफट सगळं बघून रतनगड उतरायला सुरूवात.. पहिल्या टप्प्यावर येऊन जेवलो व सह्यांकनची शेवटची उतरंड उतरायला लागलो..!तासाभरात खाली येउन hotel त भज्यांवर तुटून पडलो! .. काही वेळाने कात्राबाई कँपवरची मंडळी पाठीवर, पोटावर बोजे घेवून आली.. मान गये उनको! ही शेवटची बॅच असल्याने सगळी बांधाबांध गाडीत भरली गेली.. अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी, रतनगड, wilson dam, सूर्यास्त आणि संध्याकाळचं गुढ वातावरण.. आलेला सह्यांकन sickness!

ता.क. : प्रत्येकवेळी हेच दोन लिडर्स मिळोत म्हणून येत्या वटअमावास्येला वडाला रोप बांधणार आहोत..!

(सदर लेख सह्यांकन २०११ च्या स्मरणिकेत प्रसिद्ध झाला आहे.)