भामेरकडे वळतांनाच 'बलसाणे २५किमी' ची पाटी बघितल्यावरच डोक्यात ट्युब पेटली होती की, प्राचिन मंदिराचा ठेवा असलेलं धुळे जिल्ह्यांतलं ते हेच गांव, पण आत्तापर्यंत कुठेही वाचनात हे नव्हतं की भामेरपासून बलसाणे इतक्या जवळ आहे. पोटपूजा आटोपून बलसाण्याकडे जाण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं होतं. साक्री- नंदुरबार मार्गावर बलसाण्याचा फाटा लागतो. फाट्यापासून ३-४ किमी. आत गांव आहे. मंदिराची चौकशी केल्यावर सगळे जैन मंदिराची माहिती सांगत होते, त्यांवरून जैन मंदिराचे या गांवात बर्यापैकी प्रस्थ असल्याचे जाणवत होते. मात्र आम्ही शंकराच्या मंदिराची माहिती विचारल्यावर 'पुराना मंदिर....'म्हणून ओळखलं जाणारं मंदिर जरा उपेक्षितच असल्याचं लक्षात आलं.गांवातील मुख्य जैन मंदिराजवळून पुढे गेल्यावर गांवाबाहेर एका कुंपण घातलेल्या शेतात हा मंदिरसमुह आहे. गेट उघडंच होतं, त्यांतून आंत शिरून शेताच्या बांधावरुन या समुहापाशी आलो.
मुख्य मंदिराच्या डावीकडील २ मंदिरे अत्यंत भग्नावस्थेत आहेत. हा जर पंचायतन समूह असेल तर उजवीकडील २ मंदिरांचा मागमूसही दिसत नाही. आवारातील १ ल्या मंदिराचं छप्पर व गाभारा साफ ढासळलेला आहे. मात्र शाबूत असलेल्या खांबांवरील व तुळईवरील कोरीव काम गतवैभवाची साक्ष देतात.
हे बहुधा पंचायतनातील गणपतीचं मंदिर असावं, कारण मंदिराबाहेरच पोटावरील भाग गायब असलेली गणरायाची भग्न मूर्ती पहायला मिळते, पण अशाही स्थितीतील मूर्तीच्या डाव्या हाताची बोटे, पाय व उंदीर यांच्या घडणीतली सुबकता लक्षात येते.
२ रं मंदिरही छप्पर उडालेल्या स्थितीत आहे. गाभार्यामध्ये देवीची छातीपासून खालचा भाग नाहीशा अवस्थेतील मूर्ती आहे, पण प्रभावळीच्या रचनेवरुन मूळ स्वरुपातील रेखीव मूर्तीची कल्पना येऊ शकते.
गाभार्यातील वरच्या कोपर्यांत किर्तीमुखं कोरलेली आहेत.
संपूर्ण मंदिराचं छप्पर नाहीशा स्थितीत असलं तरी कोरीव खांब, तुळया व एकूण प्रमाणबद्धतेची कल्पना येते.
बाकी २ मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर बर्यापैकी अवस्थेत आहे. भूमीज शैलीचं शिखर असलेलं हे मंदिर ११ व्या शतकांतलं असावं. भूमीज शिखर स्थापत्त्यशैलीमध्ये, शिखर सुरु होते तिथल्या कोनाड्यापासून ते कळसाच्या भागापर्यंत मध्यभागी चटईसारख्या नक्षीची पट्टी असते व पट्ट्यांमधील जागेत छोट्या शिखरप्रतिकृतींचे थर असतात.
मंदिराच्या बाह्यांगावर सूरसुंदरींची शिल्पे आहेत. ही शिल्पे झिजलेल्या अवस्थेत असली तरी खिळवून ठेवतात.
हा समूह पाहून गेटमधून बाहेर पडल्यावर जवळच एका चौथर्यापाशी विष्णू, गणपती यांची भग्न शिल्पे ओळीने मांडून ठेवलेली दिसली. या गांवात आणखीही मंदिर/ शिल्पं असणार, पण मूळ कार्यक्रमांत अचानकपणे हा शिल्पपसारा शिरल्यामुळे आमच्याकडे वेळ कमी होता व प्रवासाचा पल्ला लांबचा होता, त्यामुळे पुन्हा कधीतरी शांतपणे हे बघायला यायचं ठरवून परतीचा प्रवास धरला. रात्री ९ वा. नासिकला परतलो.