Monday, July 22, 2013

दुर्ग चंदेरी

गेल्या ४-५ वर्षांपासून माथेरान डोंगररांगेत असलेल्या चंदेरी माथ्याचा ट्रेक मला करायचा होता. बर्‍याच जणांना मी विचारलंही होतं, पण सगळे चंदेरीच्या खालच्या गुहेपर्यंत जाऊन येणार म्हटल्यावर माझी नकारघंटाच वाजत असे. नियमितपणे ट्रेक्स करणार्‍यांकडूनदेखील दुर्लक्षित असलेल्या या चंदेरीच्या प्रेमात पडण्याचं कारण म्हणजे कुठेतरी चंदेरीच्या वाटेचं वाचलेलं वर्णन.. गांवापासून ते गुहेपर्यंत कुठेही पाणी नाही. वर गुहेजवळील टाक्याचे पाणीही घाणेरडे, त्यामुळे पाण्याचं रेशनिंग करणार्‍यांनाच हा अंगावर घेणार!..
पावसाळ्यात मात्र चंदेरी- म्हैसमाळ खिंडीतून खाली वाहणार्‍या ओढ्याला पाणी व छोटे धबधबे असल्याने इथे बर्‍यापैकी जनता जमते पण खालच्या गुहेपर्यंतच! .. पावसाळ्यांत चंदेरीच्या या गोपूरावर धुकं व ढग विहरत असतात. खिंडीतून सरळसोट कातळभिंत आव्हान देत असल्यागत खुणावत असते.
जितके शारिरीक - मानसिक श्रम चंदेरी पायथ्यापासून ते मुक्कामाच्या गुहेपर्यंत करावे लागतात, माझ्या मते तितकेच श्रम गुहेपासून चंदेरी माथा गाठायला लागतात यांवर तिथे जाऊन आलेल्या मंडळींचेही दुमत नसावे!
प्रचि १ - पेब दुर्गाच्या बाजूने भेदक चंदेरी..
श्री.संजय अमृतकर यांच्या पोतडीतून साभार..


ऑफबीट सह्याद्रीच्या ट्रेक शेड्युलमध्ये हा ट्रेक बघितला आणि लगेच जायचं निश्चित केलं. नाशिकहून अजून कोण येतंय कां याची चाचपणी केली तर माझा नेहमीचा भिडू चिन्मय आणि ॠषिकेश तयार झाले. नंतर प्रितीने (ऑफबीट सह्याद्री लिडर) श्री. संजय अमृतकर आणि ४ जण नासिकहून आहेत असं सांगितलं, म्हणजे आम्ही एकूण ८ जण नासिकहून होतो. लिडरीणमॅम प्रितीलासुद्धा प्रश्न पडला की या ट्रेकला नासिकहून एकदम गर्दी कशी उगवली?????
आमच्याकडेही उत्तर नव्हतं. नासिकचे बाकी ५ जण आदल्या दिवशी पेब किल्ला करुन पनवेलला ठरल्या वेळी येणार होते.. हा ट्रेक रात्रीच सुरु होणार होता आणि दुसरं म्हणजे चंदेरीला सगळेजण बदलापूर- वांगणीच्या बाजूने चिंचवली गांवातून चढतात पण ऑफबीटने दुसर्‍या बाजूने म्हणजे पनवेल बाजूने तामसई गांवातून ट्रेक आखला होता.
पनवेलहून आधीच ठरवलेल्या २ वडापमधून भरुन मंडळी पाऊण तासांत तामसईत पावली. पाठोपाठ उरलेली मंडळी व नासिककर ५ जण प्रायव्हेट कारने पाठोपाठ पोहोचली. रात्रीचे पावणेबारा वाजले होते. ऑफबीटच्या नेत्यांनी त्यांच्या पोतड्यांतून एकेक साधने बाहेर काढली. प्रत्येक हार्नेसला (हार्नेस म्हणजे संरक्षक दोर अडकवण्यासाठी नॉयलॉनच्या पट्ट्या शिवून तयार केलेला कंबरपट्टा) एक कॅरॅबिनर (दोर अडकवण्यासाठी असलेली कडी) व एक डिसेंडर (इंग्रजी 8 आकाराची कडी. रॅपलिंग करतांना दोर सरकवण्यासाठी या कडीचा उपयोग होतो) असे सेट्स तयार करुन प्रत्येक सहभागीकडे देण्यात आले. दुसर्‍या दिवशी प्रत्येकाने हा सेट पुन्हा परत करायचा आहे. हार्नेसही नविन दिसत होती. डिसेंडर्स तर पेटीपॅक होते. (नायतर जल्ला आमकां कधी एवडया चकाक कड्या मिरवूक गांवल्या असत्या! स्मित ) ओळख, सुचना वगैरे सोपस्कार पार पडले आणि रात्री १२.३० वाजता ट्रेक सुरु झाला.
सुरुवातीला शेताडीतून असलेली वाट काही वेळातच जंगलात घुसली आणि एकदम उभी चढण सुरु झाली. अंधार असला तरी साधारण अंदाज आला होता की आपण म्हैसमाळ डोंगराच्या सोंडेला भिडलो आहोत. वारा सपशेल पडला होता. सुरुवातीला आणि खिंडीच्या अलिकडे असे दोन वेळा ओढे पार केल्याचं आठवतंय! (आठवतंय अशासाठी की दुसर्‍या दिवशी उतराईदेखील अंधारातच झाली) जवळ्पास २ तासांनी खिंड गाठली. खिंडीत थोडं टेकून सगळ्यात मागच्या गँगचा आवाज येऊ लागल्याबरोबर उठलो आणि खिंडीतुन उजवीकडे असलेल्या चंदेरीच्या धारेची चढण चढू लागलो. खिंडीतूनही चंदेरीच्या मुक्कामाची गुहा गाठायला अर्धा- पाऊण तास लागतो. पुढे असलेल्या ग्रुपबरोबर गेल्याने झोपायच्या जागेचा चॉईस मिळाला आणि सपाट जागा बघून वळकटी टाकली. आमच्या आधीही तिथे आणखी ५-६ जणांचा वेगळा ग्रुप आलेला होता. काही वेळातच सगळी मंडळी आली, त्यांची व्यवस्था लागेपर्यंत मी आडवा होऊन निद्राधिन झालो होतो कारण पहाटे कामावर जाऊन दुपारी घरी येऊन, आवरून, पावणेदोनशे किमी. कार चालवून, संध्याकाळच्या कल्याणच्या ट्रॅफिकमधून गाडी काढून पनवेल गाठून ...^^&&&***(((@@@###!!!
सक्काळी जाग आली ती दुसर्‍या ग्रुपच्या चहाच्या स्वयंपाकाच्या गडबडीने!! चहा बनवतांनाही त्यांची गडबड स्वयंपाकाएवढी मोठ्याने सुरु होती. मी उठून सॅक आवरेपर्यंत बाकी मंडळीदेखील उठली.
प्रचि २


आदल्या रात्री लिडर्सनी, सकाळी चंदेरीला कुठल्या बाजूने सोनेरी करायचे याबद्दल सूचना देऊन ठेवल्या होत्या. स्मित त्याबरहुकूम आम्ही बाटल्या घेऊन नंतर होणारा हल्लाबोल लक्षात घेऊन म्हैसमाळच्या बाजूला धावलो. गुहेनंतर लगेच एक खोदीव टाके आहे. पाणी खरं तर लोकांनी खराब केलं आहे. सकाळची कोवळी उन्हे अंगावर घेत भोवतालचे सगळे डोंगर पहुडलेले होते. या बाजूला म्हणजे चंदेरीच्या पश्चिमेला म्हैसमाळ, त्याच्या मागे मलंगगड आणि तावली, वर्‍हाड्याचे सुळके आणि गणेश- कार्तिक सुळके दिसत होते.
प्रचि ३

चंदेरी सोनेरी करुन परत गुहेकडे आलो तोवर तिथे तांदळाची भाकरी व खर्ड्याचा नाश्ता तयार होता.
प्रचि ४


सॅक्स गुहेतच ठेवायच्या होत्या. एक ऑफबीट राखणदार गुहेतच रहाणार होता. प्रत्येकाने काल दिलेले हार्नेस लिडर्सच्या मदतीने कंबरेला बांधले. एका छोट्या सॅकमध्ये दोघातिघांच्या पाण्याच्या बाटल्या व घरुन आणलेले चॅवमॅव त्यासोबत घेऊन पुढे निघायचं होतं. गुहेकडून पूर्वेकडे निघालो. ५ मिनिटांनंतर घसार्‍याचा उतार आला. या ठिकाणी रोप लावला गेला. इथे काही खोदीव पायर्‍या आहेत पण घसारा आणि लगतच खोल दरी यामुळे सावधगिरीसाठी रोप लावला होता. प्रत्येकाला काळजीपुर्वक उतरवले गेले.
प्रचि ५


पुढे पूर्व टोकाकडे एक चांगल्या पाण्याचे टाके आहे. या ठिकाणी बाटल्या भरुन घेतल्या. इथून आता खरी चढाई सुरु होणार होती चंदेरीच्या अजस्त्र भितीचा माथा गाठण्याची...!
प्रचि ६


साधारणपणे पाऊण तासात माथा गाठता येतो पण प्रचंड घसारा, मध्ये मध्ये पायर्‍या आहेत पण अरुंद आणि खोल दरी!! .. या सगळ्यामुळे हळूहळू प्रत्येकजण काळजीपूर्वक वर चढत होता.
प्रचि ७


एका घळीतुन वाट वर सरकते तिथेही मातीचा घसारा आहे.
प्रचि ८


या घळीच्या शेवटी मात्र उजवीकडे पाण्याचं टाकं आहे. या ठिकाणाहून वळ्यावळ्यांचा नाखिंड डोंगर एकदम झक्कास दिसत होता.
प्रचि ९


अखेर एकदाचे माथ्यावर आलो. ओबडधोबड दगडांचा अरुंद माथा आहे. वर अवशेष काहीही नाहीत. हल्लीच कुणीतरी बसवलेला श्रीशिवरायांचा पुतळा आणि ध्वज आहे.
प्रचि १०


इथून शेवटच्या टोकाकडे जातांना प्रितीने 'तुम्हाला सुसाईड पॉईंट दाखवते' असं सांगून पुढे व्हायला सांगितलं. अरुंद माथ्यावरुन नीटपणे जात असतांना एके ठिकाणी गाडी अडली ती एका मोठ्ठ्या बोल्डरला वळसा घालतांना.. छातीकडे तो एकदम पुढे आलेला असल्याने प्रत्येकाला मागे झुकून नीट खाचा पकडून पुढे जावे लागत होते. पाठी थेट खोल खोल खोल... !!!
प्रचि ११


खरं तर खाली बसुन आलं तर त्या पुढे आलेल्या बोल्डरचा काही त्रास झाला नसता पण ही आयडीया परत येतांना निखिलने दाखवली. प्रिती पलिकडून हसत सांगत होती..'यही है वो सुसाईड पॉईंट' ! एकदम टोकाला जाऊन सगळ्यांचे धम्माल फोटोसेशन झाले. माथ्यावरून दक्षिणेला गाढेश्वर तलाव, प्रबळगडाचे लांबलचक पठार व त्याच्यामागे इर्शाळ गड दिसत होता, तसेच लांबवर अंधुकसा कर्नाळा दुर्ग खुणावत होता.
प्रचि १२ .. समोर आडवा पसरलेला प्रबळगड, त्याला लागून उजवीकडे कलावंतीण दुर्ग आणि डावीकडे अंधुकसा इर्शा़ळ दुर्ग..


पूर्वेला माथेरानचे पठार, पेबचा किल्ला तसेच नाखिंड डोंगर दिसत होता. पायथ्याचं जंगल दाट दिसत होतं. खोदीव पायर्‍या, टाकी व गुहा यांवरुन हा दुर्ग प्राचिन असणार पण टेहळणी चौकी म्हणूनच याचा उपयोग होत असेल. डोळे निवल्यावर खाली उतरायला सुरुवात केली.
प्रचि १३


घळ पार केल्यावर आता खाली उतरायला जास्त वेळ नाही लागणार अशा विचारात असतांनाच लिडर्सनी घोषणा केली की कुणीही वाटेवरून खाली उतरायचे नाहीये, आपल्याला रॅपलिंग करुन उतरायचे आहे. झाले! त्या उतारावर ऐन माध्यान्हीच्या टळटळीत उन्हांत सगळी ट्रॅफीक जाम होऊन जागेवरच बसली. वाटेतच असलेल्या एका मजबूत झाडाला अँकरींग केले गेले आणि एकेक भिडू रॅपल करत खाली जाऊ लागले. सगळ्यांत हैराण करणारी गोष्ट ही होती की खालचे गारेगार पाण्याचे टाके नुसते दिसत होते आणि आमच्याकडील पाणी संपले होते.
प्रचि १४

वरुन ऊन, खालून ऊनऊन, जवळ पाणी नाही... खाली नुसते दिसणारे गार पाण्याचे टाके...आणि आपला नंबर कधी येतोय याची वाट पहात तापणारे आम्ही!! वरच्या टाक्यातूनच पाणी भरुन घ्यायला हवे होते. ऋषी म्हणाला होता तेव्हा पण खाली जायला एवढा वेळ लागेल याची तेव्हा कल्पना आली नाही.. त्यामुळे तो मागून मला शिव्या देत बसून राहिलेला...!!
प्रचि १५


आणखी एक दोर लावला गेला आणि एकाच वेळी दोन जण खाली जायला सुरुवात झाली.. मला मागून चिन्मय आणि ऋषी मागून ओरडत होते की खाली गेलास की पाणी पाठव वर... !! माझा नंबर लागल्यावर मी त्या पाण्याच्या ओढीने एवढा झपाझप खाली आलो की खाली असलेला निखिल माझे रॅपल होत असतांना माझ्यावर किंचाळत होता.. स्मित रोप फ्री करुन आधी पाण्याकडे धावलो. आमची कॉमन सॅक माझ्याकडेच होती. तिच्यातील बाटल्या भरल्या आणि पुन्हा वर पाठवल्या तोवर चिन्मय खाली आला होता पण वर उरलेल्यांना तरी पाणी मिळालं. शेवटचा भिडू खाली आला तेव्हा साडेपाच वाजत आले होते. निखिलने वाईंडअप केले आणि झपाझप गुहेकडे निघालो. वडापवाल्यांचा मध्ये फोन येऊन गेला होता, त्यांना रात्री ८.३० ची वेळ दिली गेली होती. सकाळच्या भाकरी- खर्ड्यानंतर पोटात काहीही घातलेलं नव्हतं.. (मध्येच लाडू- चिक्क्या वगैरे चालू होतं पण कावळे त्याने थोडेच गप्प बसतात??)
गुहेत येऊन डबे उघडले तोवर भूक अर्धमेली झाली होती. दही- पराठा वगैरे चापलं आणि साडेसहाला परतीची उतरंड सुरु केली. खिंडीत येईपर्यंत अंधार पडला होता. गप्पा मारत झपाट्याने निघालो. एकदम ठळक वाट असल्याने चुकण्याचा प्रश्न नव्हता. साडेआठला तामसईत आलो तर वडाप उभी होती पण डायवर दुसर्‍या वडापला भाडं मिळाल्याने त्याच्याबरोबर पुन्हा पनवेलात गेला होता. सगळी साधने जमा केली गेली. नासिकची दुसरी टीम पुढे येऊन आधीच निघाली होती कारण ते रात्रीच नासिक गाठणार होते. आम्ही पनवेललाच माझ्या नातेवाईकांकडे थांबून पहाटे निघण्याचे ठरवले होते. ९.३० ला वडाप आली. साडेदहाला पनवेल. पावणेअकराला घरी.. काहीही न बोलता तिघांकडून जेवणाच्या सगळ्या पातेल्या साफ. मस्त झोप घेऊन सकाळी ६ ला निघून ९ ला परत नासिक.
चंदेरी चंदेरी चंदेरी!!! उत्तम रीतीने एकदाचा पार पडला तो केवळ ऑफबीटर्समुळे. .. आम्हां दोघांनाही (ऑफबीट आणि मी) नविन वर्षातील नवनविन ट्रेकरुट्ससाठी अनेक शुभेच्छा! स्मित
..... आणि तुम्हांलासुद्धा !! स्मित
प्रचि १६