Saturday, March 10, 2012

दुर्ग उंदेरी

बर्‍याच वर्षांपूर्वी समीर कर्वेंचा खांदेरी दुर्गावरील मटा मधला लेख आणि फोटो पाहून खांदेरी-उंदेरीसाठी तगमग बराच काळ सुरु होती. तीनेक वर्षांपूर्वी चक्रम हायकर्सच्या विनय आणि आशुतोषने सहसा न होणार्‍या सागरी दुर्गांच्या सफरीचा घाट घातला. खांदेरी- उंदेरी- सुवर्णदुर्ग- पद्मदुर्ग हे ४ दुर्ग तर 'करायचेच' कॅटेगरीत होते. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे परवानगी आणि स्थानिक नावाड्यांशी संपर्क. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. खांदेरी- उंदेरीला जायला पोर्ट ट्रस्टची परवानगी लागते, तिथे नावाडी मिळत नाहीत वगैरे अडचणींमुळे ही दुर्गजोडी राहिलीच होती. त्यामुळे विनयचा कासोटा घट्ट पकडून ठेवायला हवा होता.
तारीख समजल्यावर सगळी बाकीची कामे बाजूला सारून मी आणि नाशिकहून आणखी दोघेजण मोहिमेच्या आदल्या दिवशी नोकरीनिमित्ताने डोंबिवलीला असणार्‍या चिन्मयकडे डेरेदाखल झालो. तोही येणार होताच. पहाटे चौघेही मुलुंडला ठरल्या वेळी पोहोचलो.
खांदेरी- उंदेरीला जाण्यासाठी अलिबागच्या पुढे ६ किमी. वर असलेल्या थळ गांवांत पायउतार झालो.
प्रचि १

वातावरण धुकट होतं. ओहोटी असल्याने उंदेरी अगदी जवळ दिसत होता व लांबवरील खांदेरी काहीसा अंधुक अंधुक! या थळलादेखील एक छोटा किल्ला आहे.
थळचा हा खूबलढा कोट जंजिरेकर सिद्दीने इ.स. १७४९ मध्ये घेतल्याचा उल्लेख आहे, पण पुढच्याच वर्षी तो मराठ्यांनी घेतला. त्या लढाईसंबंधी राणोजी बलकवडेंच्या पत्रात माहिती आहे..
' शामलाने (सिद्दी) सुरतेहून आरमार व लोक आणून न शोकी (मग्रुरी) करुन खुशकीस (जमिनीवर) उतरुन थलचे खुबलढियास मोर्चेबंदी केली. मानाजी आंगरे व शामलाचे युद्ध बरेच जाले. मानाजी आंगरे यांस मांडीवर गोलीची जखम लागली. गनीम भारी. मोराजी शिंदे, रामाजी महादेव सारे मिळून येलगार केला. गनीम मारुन काढिला. मोर्चे सोडविले. शामलाचे से दोनसे माणूस ठार मारिले व से दीडसे दस्त केले.
हा थळ गांवातून दिसणारा अंधुक उंदेरी. प्रचि मध्ये दिसणारे निशाण भरतीच्या वेळी खडक असल्याचे सूचित करते.
प्रचि २

आमच्या समोरच जोत्याच्या उंचवट्यावर मासळी वाळत घातलेली होती. आम्ही होडीची वाट पहात उभे असतांना बाजूच्या ओसरीच्या खांबांवर व भिंतीवर ही काव्यफुले दिसली.
प्रचि ३

प्रचि ४

होडीसाठी जेटीच्या भिंतीवरुन जातांना ..
प्रचि ५

आमच्याबरोबर काही बैलगाड्याही बाजूच्या पाण्यातून आतल्या बाजूस येतांना दिसत होत्या. होडयांमधली मासोळी या बैलगाड्यांत भरून किनार्‍यावर आणली जाते. हे बैलही पाण्याला चांगलेच सरावलेले होते..
प्रचि ६

प्रचि ७

इथून पुढील कार्यक्रम नावाड्यांच्या हातात होता. आधी उंदेरी करुन मग खांदेरी करायचा असे ठरले. आमच्या मोठ्या नांवेबरोबर एक छोटी होडीदेखील होती. लाटांच्या हेलकाव्यांनी आमच्यातल्या एकदोन घाटी लोकांना अशा प्रवासाची सवय नसल्यानं त्यांचं पोट रिकामं करायला लावलं.
प्रचि ८

उंदेरीच्या जवळ मोठ्या बोटी जाऊ शकत नाहीत, त्यामुळे एका ठराविक अंतरावर मोठी बोट थांबली व ह्या छोट्या होडीने आम्हांला गटागटाने उंदेरीवर नेऊन सोडले.
प्रचि ९

उंदेरी दुर्गाला खांदेरी दुर्गासारखी होडी लावायला जागा नाही. त्यामुळे ओहोटी असूनही होडीच्या हेलकाव्यात सर्कस करीतच उंदेरीवर पायउतार झालो.
प्रचि १०

खांदेरी बेटाच्या मानाने उंदेरी बेट छोटे आहे. प्रवेशद्वाराची चौकट शाबूत आहे. या चौकटीच्या बीमच्या दगडांची रचना पहाण्यासारखी..
प्रचि ११

प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे वळून पुढे आल्यावर पाण्याची ३ मोठ्ठी टाकी दिसली. आता सगळं शेवाळलेलं पाणी आहे आणि झाडोराही भरपूर माजला आहे.
प्रचि १२


प्रचि १३

आश्चर्य म्हणजे मोठमोठ्या शिळा एकमेकांवर ठेवून तटबंदीची बांधणी केली असली तरीदेखील ती बर्‍यापैकी सलगपणे शाबूत आहे.
प्रचि १४

उंदेरी किल्ल्याला ४ कोपर्‍यांवर चार भक्कम बुरुज असून पूर्व- पश्चिम बाजूच्या तटात प्रत्येकी ४ असे एकूण १२ बुरुज आहेत.
प्रचि १५

आतमध्ये अवशेष बरेच आहेत पण बर्‍यापैकी ढासळलेले..
प्रचि १६

काही थडगीदेखील दिसतात, ती कुणाची याचा काही उल्लेख आढळत नाही.
प्रचि १७

तटातील चोरदरवाजा..
प्रचि १८

दुर्गावर तोफा भरपूर आहेत. सगळ्या इतस्ततः पसरलेल्या दिसतात.
प्रचि १९

प्रचि २०

गडफेरीला दिड तास पुरतो. या दुर्गावर एक तळघर असल्याचा उल्लेखही आहे. मिळाला तेवढा वेळ आम्ही शोधाशोध केली पण मिळालं नाही. उंदेरीला पुन्हा उंडारण्यासाठी हे निमित्त पुरेल.
चौलचा सुभेदार कॅस्ट्रो याने खांदेरी- उंदेरी या दोन्ही दुर्गांचं बांधकाम व्हायच्या आधी उंदेरी बेटाबद्दल एक नोंद केलेली आहे..
'१५३८ च्या सुमारास त्याला एक पोकळ दगड उंदेरी बेटावर मिळाला. तो दगड होकायंत्राजवळ नेताच त्यांतील सुई फिरु लागली. मात्र तो दगड फोडल्यावर सुईचं फिरणं कमी झालं. बेटावरील इतर दगडांमुळे मात्र असा परिणाम झालेला आढळला नाही. मात्र ज्या दगडाने हा गुणधर्म दाखवला त्यांत लोहाचा अंशही नव्हता.'
सिद्दी कासमने खांदेरी किल्ल्यावरील मराठ्यांना शह देण्यासाठी ९ जानेवारी १६८० मध्ये उंदेरी बेट ताब्यात घेतले व दुर्गाचे बांधकामही सुरु केले.
अँडर्टन हा अधिकारी मुंबईला कळवतो की,' २७ जाने. - काल पहाटे शिवाजीच्या आरमाराने उंदेरी काबीज करण्याचा प्रयत्न केला. सिद्दीने फारच चांगले तोंड दिले. शिवाजीचे सुमारे ३० तरांडी आली होती. पुष्कळ गोळागोळी झाली. दौलतखानाचे बरेच नुकसान झाले असावे. कारण भरतीच्या वेळी फुटक्या होड्यांचे तुकडे व ८ प्रेते तरंगतांना पाहिली. सिद्दीचे ३ शिपाई मेले व ७ जखमी झाले.
पुढे संभाजीराजांच्या काळांत १८ ऑगस्ट १६८० रोजी मायनाक भंडारीच्या मुलाच्या हाताखाली २०० लोक देऊन उंदेरी जिंकण्याचा प्रयत्न करण्यात आला पण सिद्दीला आधीच चाहूल लागल्याने मराठ्यांचा पराभव झाला. यावेळी मायनाक भंडारीचा मुलगा व ८० मराठे कामी आले.
सन १८८१ च्या जुलै मध्येही मराठ्यांनी पुन्हा उंदेरीवर हल्ला केला. सिद्दीचं नुकसान झालं पण किल्ला काही हाती लागला नाही. अशा प्रकारे शिवाजीराजे व संभाजीराजे या दोघांच्याही कारकिर्दीत मराठ्यांना उंदेरी दुर्ग जिंकता आलेला नाही.
पुढे सन १७३२ मध्ये छत्रपती शाहूंनी सिद्दीविरुद्ध मोहिम उघडली. त्यावेळी बाजीराव पेशवे अंबाजीपंत पुरंदरे यांना २६ मे १७३३ च्या पत्रांत लिहितात..' परंतू याचे (सिद्दीचे) दोन हात जबरदस्त आहेत. येक आंजनवेल (गोपाळगड) व येक उंदेरी. सरखेल उंदेरीस खटपट करतील व ते दोन्ही स्थळे हातांस आलियावर याची हिंमत कम होईल व आसराही तुटेल' यावेळीही उंदेरी अजिंक्यच राहिला.
शेवटी २८ जाने. १७६० रोजी नारो त्रिंबकनी उंदेरी दुर्ग जिंकला व त्याचे नांव जयदुर्ग ठेवले. सिद्दीने वारंवार हल्ले करूनही त्याला शेवटपर्यंत हा किल्ला जिंकता आला नाही. सन १८१८ मध्ये इंग्रजांनी या दुर्गाचा ताबा घेतला. सन १८२४ मध्ये तो आंग्रेंना दिला. पुढे आंग्रे संस्थान खालसा झाल्यावर १८४० नंतर हा किल्ला इंग्रजांकडेच राहिला.
या दुर्गाचा हा आतापर्यंतचा इतिहास..
आम्ही उंदेरीला वळसा मारून खांदेरीकडे निघालो खरे पण आम्हांला न सापडलेलं लेणं व ते तळघराचं गुढ बाळगून असलेलं उंदेरीचं बेट मान वळवून पहायला लावत होतं..


क्रमशः..