'सकाळी सहाऐवजी साडेसहाला हुतात्मा स्मारकाबाहेर जमायचे आहे' राहुलचा रात्री मेसेज मिळाल्यावर सुट्टीची साखरझोप अजून अर्ध्या तासाने वाढली. पहाटे खुडबुडत सॅक भरून अशोकस्तंभावर गाडी लावली. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, २६ जाने. यादिवशींच्या पहाटवेळांत खूप वेगळं चैतन्य असतं, त्यापैकीच एक १५ ऑगस्टचीही असते. एरवी दिसतात ते पोटार्थी (म्हणजे पोटासाठी कामाला लागलेले आणि पोट कमी करण्यासाठी नाईलाजाने चालणारे/ धावणारे). लहान मुलांची झेंडावंदनासाठी कडक कपड्यांत शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. आमचंही, नाशिकच्या वैनतेय गिर्यारोहण-गिरीभ्रमण संस्था आणि यंदाच्या गिरीमित्र संमेलनावेळी स्थापन झालेल्या दुर्गभरारी संस्थेतर्फे झेंडावंदन ठरलं होतं ते आडबाजुला असलेल्या धुळे जिल्ह्यातल्या भामेर दुर्गावर. ७ वा. ७ भिडू घेऊन आमची टवेरा एकदाची निघाली. वाटेत वडाळीभोईला जैन हॉटेलात मिसळ, भजी, पेढे आणि चहाचं पेट्रोल भरून निघालो तोवर साडेआठ वाजत आले होते.
आता कुठेही टीपी न करता थेट साक्रीला पोहोचणे होते. वाटेत चौल्हेर, डोलबारी रांग, पुढे मांगी- तुंगीची सेलबारी रांग, उजवीकडे पिसोळ- डेरमाळ दुर्गांची रांग डोंगरटोके उंचावत साद घालत होती.साक्री- नंदुरबार रस्त्यावर भामेर किल्ल्याकडे जायचा फाटा लागतो. नाशिक ते भामेर गांव १८० किमी. अंतर आहे. गांवात शिरल्याबरोबर प्रवेशद्वाराचं गतवैभव दाखवणार्या कमानीने लक्ष वेधून घेतलं. या कमानीच्या बाजूलाच बारव आहे. बाजूलाच भल्या थोरल्या डोणी आहेत आणि अजूनही वापरात आहेत.
भग्न प्रवेशद्वारामागील नक्षी कोरलेले ८-९ फूट उंच खांब देखणे आहेत. पैकी एका खांबाचं फिनिशिंग एक्दम ग्रॅनाईटप्रमाणे गुळगुळीत आहे. जवळच एका जुन्या मशिदीचेही पडके अवशेष दिसतात.
एका मुलाने गाडी किल्ल्याच्या पायथ्याकडे असलेल्या शिवमंदिरापर्यंत जाईल असं सांगितल्यामुळे गांवातले अवशेष नंतर बघायचं ठरवून गाडी अरूंद बोळांतून शेवटपर्यंत दामटवली. साडेअकरा वाजत आले होते. दोघेजण बरोबर घेतले आणि चढाईला निघालो. भामेर दुर्गाच्या डोंगराचे ३ भाग आहेत. गांवात घुसलेल्या डोंगरसोंडेवर पांढरा रंग दिलेली पिराची घुमटी आहे. या पीराला पांढर्या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. मधल्या टेकडीच्या पोटाच्या घेराशी खोदलेल्या गुहा-टाकींचा पट्टा आवळलेला आहे. तिसरा सगळ्यांत उंच असलेला तो बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. पायथ्याशी असलेला खंदकाचा बुजत आलेला खड्डा ओलांडून १५ मिनिटांत पिराची टेकडी व मधल्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो. येथील प्रवेशद्वार ढासळलेलं असलं तरी दुतर्फा उभे असलेले उंच दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात. डावीकडे वळून पायर्या चढून वर आल्यावर शिलालेख कोरलेल्या भग्न कमानीचा आडवा झालेला तुकडा दिसला. इथून उजवीकडे जाणारी वाट गुहा कोरलेल्या टेकडीकडे जाते. या टेकडीच्या पोटांत रांगेने ही पाण्याची गुहा टाकी मोठ्या संख्येने खोदलेली आहेत. अरूंद पायवाटेने जात ती सगळी टाकी बघता येतात.
टेकडीला प्रदक्षिणा घालत सगळी टाकी बघून वर आलो आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. इतक्या प्रचंड संख्येने गुहाटाकी दुसर्या कुठल्याही किल्ल्यावर नसतील. बालेकिल्ल्याकडे जातांना मध्येच कातळ कापून खाच पाडल्याने हा भाग थोडा विलग झाला आहे. या खिंडीत पायर्या आहेत. इथून पुढे पायर्यांच्या वाटेने चढतांना आणखी एक प्रवेशद्वार लागलं. इथे डावीकडे रचीव दगडांचा बुरूज आणि उजवीकडे रचीव तटबंदी दिसली. वर आल्यावर सतीमातेच्या छोट्याशा मंदिराच्या डावीकडे वळून टोकाकडे जाऊन पलिकडचा देऊरचा डोंगर पाहून परत फिरलो.
या डोंगरावरही काही लेणी आहेत. पूर्वेला जुळे सुळके दिसतात, ते रवळ्या- जवळ्या नांवाने ओळखले जातात. (रवळ्या-जवळ्या हे सातमाळा रांगेतले २ किल्ले वेगळे).
मंदिराची जागा झेंडावंदनाला योग्य होती. मंदिराच्या शेजारी खोदीव टाके आहे.
झेंडावंदन व राष्ट्रगीत झाल्यानंतर उतरतांना मधल्या डोंगराच्या पोटात असलेली लेणी वाटेतच दिसली. तिनही द्वारांच्या चौकटींवर नक्षी आहे. पहिल्या द्वाराच्या उंबर्याकडे दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. शेजारीच भली मोठी कोठाराप्रमाणे वापरली जात असावी अशी गुहा खोदलेली आहे. सध्या त्यांत पाणीच साठलेलं आहे. इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. उतरायला लागून वीसेक मिनिटांत परत गाडीकडे पोहोचलोसुद्धा. गांवातच दक्षिण भारतीय घडण वाटावी अशा एका मोठ्या नंदीची भग्न मुर्ती दिसली. त्याला लागूनच नक्षी असलेला खांबही आडवा झालेला आहे.
पूर्वी इथे मंदिर असावं. गांवात ठिकठिकाणी तटबंदीचे, विविध नक्षीं कोरलेल्या भग्न दगडांचे अवशेष दिसतात.
महाभारत काळांत भामेरचं नांव भंभागिरी असावं. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने भामेरला अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला, अशी दंतकथा.गडावरील लेणी- गुहांवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. लेणी असल्यामुळे भामेरजवळून प्राचिन राजमार्ग जात असावा. १२ व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. देवगिरीच्या सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. इकडे यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनींच्या काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होता. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढार्यांच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ. ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले. गांवाबाहेर एका वडाच्या झाडाखाली पोटपुजा केली आणि जवळच असलेल्या आणि अचानकपणे गवसलेल्या, प्राचिन ठेवा असलेल्या गांवाकडे गाडी वळवली.... (क्रमशः)
संयोजनः वैनतेय गिरीभ्रमण, नासिक
सहभागी: राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, सुदर्शन कुलथे, पी.के. पाटील, हेमंत देशमुख, नील माहिमकर, अनुपम कामत
Bhamer durg is one of milestone of Royal families in Maharashtra.
ReplyDeleteजबरा
ReplyDelete- पाषाणभेद