Thursday, January 6, 2011

सुवर्णदुर्गाच्या मुलुखांत...भाग २

आपटेकाकांनी रात्रीच एक मोठं आमिष दाखवून ठेवलं होतं '..सकाळी या मंडळींचं आवरून व्हायच्या आत आपण मुरुडचं दुर्गादेवी मंदिर बघून येऊया'.. आदल्या दिवशीच्या धावपळीचा शीण अंगात असूनही सकाळी लवकर जाग आली. आणखी काही जण तयार झाले. सेनापती विनयच्या कानांत कुजबुजून आम्ही मुरुडकडे पायीच निघालो.

मुरुड गांवात शिरल्याबरोबर समोरच दुर्गादेवीचं भव्य मंदिर दिसतं. पेशवेकालीन भव्य असलेल्या या मंदिरासमोर दगडी दिपमाळ आहे.

आत शिरल्यावर डावीकडे एक मोठी पितळी घंटा दिसते तिच्यावर पोर्तुगिज शब्द कोरलेले आहेत. आतमधील लाकडी खांब व वाशांवरील कोरीव काम खूप देखणं आहे. सध्या ऑइलपेंटने रंगवलेलं असलं तरी त्याचं सौंदर्य अजिबात कमी झालेलं नाहीये. पैकी हत्तींची झुंज, भल्या थोरल्या नागाचं शिल्प बघणेबल आहे.

गाभार्‍‍यातील श्रीदुर्गादेवीची मूर्ती खूप सुंदर आहे.

मंदिरासमोर एक झिजलेला गधेगाळाचा दगड आहे. मंदिराच्या आवारातही आणखी छोटी मंदिरे आहेत. या दुर्गादेवी मंदिराच्या चौकातच महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे.
मुरुडच्या शाळेनं तीन भारतरत्ने निर्माण केली आहेत. पां. वा. काणे, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाबासाहेब आंबेडकर हे तिघेही या मुरुडच्या शाळेचे विद्यार्थी. मुरुड हे कर्वेंचं गांव. चौकाजवळच महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या वस्तू जतन करुन ठेवलेलं संग्रहालय आहे. महर्षी कर्वेंच्या पुनर्विवाहाचा योग ज्या वझे कुटुंबियांनी जुळवून आणला, त्या वझेंच्या आजच्या पिढीने स्व्तःच्या खाजगी जागेत हे स्मारक उभं केलेलं आहे. महर्षी कर्वेंच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू, जगातील नामवंत मंडळींसोबत असलेली त्यांचे दुर्मिळ फोटो, त्यांच्या हस्ताक्षरातील कविता, त्यांच्या कार्याची ओळख व चरित्रपर माहिती येथे बघायला मिळते. येथे प्रवेश विनामुल्य आहे. या संग्रहालयाच्या मागील बाजूस वझेंचं सागरीका रिसॉर्ट आहे. (फोन नं. ०२३५८-२३४७३७) अगदी समुद्रकिनारी, नारळ-पोफळीच्या बागेत त्यांनी निवास व भोजनाची सोय केलेली आहे. आमच्यातील दोन आरंभशूर सदस्य मंदिर बघत असतांनाच आलेली बस बघून पळाली होती. आम्ही हे सगळं बघून सरळ रीक्षा करून पुन्हा जोशांच्या हॉटेलपाशी येऊन कळपांत सामिल झालो आणि सकाळची पोटपूजा करून घेतली.
आता टार्गेट मंडणगड. ..पण विनयच्या डोक्यात वाटेत लागणार्‍या पालगडाचा किडा (..की पालीची शेपूट!) वळवळत होता. पालगड गांवात गाडी घातली. स्थानिकांकडून गडाच्या वाटेबद्दल सामान्य ज्ञानाचा तास झाल्यावर लक्षात आलं की आत्त्ता हे होणे नाही. पालगड हे साने गुरुजींचं जन्मगांव. गांवात त्यांचं स्मारकही आहे. हम्म्म्म! पुन्हा कधीतरी!! आता मंडणगड... मंडणगड गावांत शिरतांना ड्रायव्हर केबिनमध्ये बसलेला मी, आपटेकाका आणि ड्रायव्हरने एक धमाल गोष्ट बघितली... एक बैल पुढचे दोन पाय वर करुन कशावर तरी चढला होता. लांबून काही अंदाज येईना की ह्याचं नेमकं कांय चाललंय! गाडी थोडी जवळ आल्यावर ड्रायव्हरने हॉर्न दिला...आणि पॅशन प्लस बाइकवर चढलेला बैल तिच्यासकट रस्त्यालगतच्या उतारावर धडपडला. कोण कशाने पॅशनेट होईल काssss ही सांगता यायचं नाही ..असो. आता जेवणाची काहीतरी व्यवस्था सांगूनच किल्ला बघायला जायचं असा बेत ठरला होता. एकाने गांवाच्या अलिकडे एक घैसास म्हणून खानावळ आहे म्हणून सांगितले होते, तिथे गेलो तर आम्ही त्यांची वडीलोपार्जित जमिन मागत असल्याप्रमाणे अटी घालायला सुरुवात केली. शेवटी वैतागून निघालो आणि मुख्य चौकाच्या थोडं अलिकडे उजव्या हाताला बेसमेंटला एक छान हॉटेल गावलं..तो पहिल्याच्या बरोबर उलट! सगळ्या गोष्टींना 'हो' देत आमच्या सॅक्स ठेवायला वेगळी जागाही दिली. त्याला ऑर्डर दिली आणि आम्ही मंडणचढाईकरीता कूच केले. मंडणगडावर जायला वरपर्यंत कच्चा गाडीरस्ता झालेला आहे. त्याच रस्त्याने पाउण ते एक तासात वर पोहोचायला होतं. शेवटच्या टप्प्यांत थोडया पायर्‍या आहेत. वर आल्यावर उजव्या बाजूला काही जोती, थडगी सोडली तर फारसे अवशेष नाहीत. मागे फिरून डावीकडच्या बाजुला निघालं की बांधकामाचे अवशेष, तटबंदीचे अवशेष दिसतात. एक मोठा तलाव व त्याच्या वरच्या बाजूला गणेशमंदिर आहे.

तलावाकडून दक्षिण टोकाकडे जातांना उजवीकडे एक देवकोष्ठासारखी कमान दिसते, ती कसली याचा मात्र उलगडा झाला नाही.

पुढे गेल्यावर एक टाकं आहे, तोफा आहेत. शिलाहार राजा भोजाने १२व्या शतकांत या किल्ल्याची उभारणी केली. १६व्या शतकांत अदिलशाहीकडे हा किल्ला होता. खोगिरासारख्या आकाराच्या गडफेरीला दिडेक तास पुरतो. उतरतांना पोटांत कावळ्यांचा डीजे चालू झाला होता, त्यांत त्रास म्हणजे त्या उन्हांत उतरतांना जेवणाचा माहित असलेला फर्मास मेन्यू डोळ्यासमोर नाचत होता. एकदाचे त्या हॉटेलात जाउन कोसळलो. तृप्त होऊन परतीच्या प्रवासात बसल्याबरोबर पुर्णब्रह्म अन्न डोळ्यांत उतरले. सुवर्णदुर्गाच्या सुवर्णमुलुखाची आलेली सुवर्णनशा घरी आल्यावरही तशीच होती... ! अजूनही अधूनमधून तरंगवतेय!!

1 comment:

  1. maja aali. tuzhi shabda sampada jordaar aahe. aani kahi vakye tar khasach. पुर्णब्रह्म अन्न डोळ्यांत उतरले.

    ReplyDelete