Wednesday, January 19, 2011

किल्ल्यांवरची हागणदारी...!

तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार गेल्या पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा! नाणेघाट म्हणा किंवा हरिश्चंद्रगड, राजमाचीला मोठ्या पठारवजा जागा तरी आहेत पण रतनगडावर मुक्कामाच्या गुहांच्या जवळपास सपाटी नसल्याने (..आणि मुळातच रतनगडावर सपाटीचा भाग अतिशय कमी आहे) आणि जोडून कसल्यातरी आलेल्या सुट्ट्यांमुळे मुक्कामी असलेल्यांची संख्या मोठी असल्याने प्रातर्विधीच्या कार्यक्रमाला काहीच शिस्त नव्हती. रतनगडावर दरवाजा ओलांडून वर आलं की उजवीकडे वरील बाजूस राणीचा हुडा नांवाने ओळखला जाणारा गोल बुरूज आहे. तिथून थोडं डावीकडे वर पाण्याची टाकी आहेत. रतनगडावर मुक्कामी असणार्‍यांना पिण्यासाठी या टाक्यांचं पाणी सर्वात जवळ..! या टाक्यांजवळ कोंबड्यांच्या पिसांचा पसारा आणि इतर मद्य-मांसाहारी घाण टाकलेली होती. ( ..हा त्रास माहुलीलादेखील होतो) इथून मागील बाजूस जाणार्‍या पायवाटेवरच हागणदारीला सुरुवात झाली होती. आमच्याबरोबर दोघे- तिघे रतनगडाचे पहिलटकर होते, त्यांनी ही घाण पाहून तिथूनच कलटी मारायच्या गोष्टी सुरु केल्यावर मात्र त्यांना चुचकारत कसं तरी पुढे नेलं. पुढील गडदर्शनाने गेलेला मूड परत आला हा भाग वेगळा पण हा अनुभव वाईट्ट होता.


गडावरील जाण्यायेण्याच्या वाटा, स्मारके इ. जागा टाळून मंडळींनी आपले विधी उरकायला हवेत . ..पण हल्ली होतं कांय की सुट्टीच्या दिवशी अनेक गट किल्ल्यावर मुक्कामी असतात, त्यांत वर वर्णिलेली जनताच भरपूर असते. सकाळी पॉटघाईच्या वेळी जागा शोधायला वेळही नसतो अशा वेळी मुक्कामी असलेल्या प्रत्येक गटाच्या नेत्याने आदल्या रात्री आपल्या गटाला प्रातर्विधीच्या जागेबाबत सूचना देणं अपेक्षित म्हणण्यापेक्षा अनिवार्य असतं. ते होत नाही आणि मग किल्ला दर्शनाच्या वेळी हा सगळा त्रास सोसण्याची वेळ बाकी जनतेवर येते. आता बायोडिग्रेडेबल वगैरे असलं म्हणून कांय कुठेही टाकायचं की काय? काही सूचनांचा अवलंब केला तर खूप त्रास कमी होईल. त्या म्हणजे - आदल्या दिवशीच नेत्याने सर्व सहभागींना योग्य जागा दाखवून ठेवावी. मुली/ महिलांना वेगळी जागा ठरवून ठेवावी. महत्त्वाची सूचना म्हणजे दगडाने छोटा खड्डा करावा आणि विधी आटोपल्यावर वर माती टाकावी याचे कारण एखादा कँप असेल आणि प्रातर्विधीची जागा जरी लांब असली तरी कँपवर माशांचा त्रास होतो तो होत नाही, हा अनुभव आहे! किमान एवढया सूचना अवलंबल्या तरी आपले व इतरांचे गडदर्शन सुखकर होईल.
खरं तर हा खरडायचा विषय नव्हे पण भोग भोगल्यावर तितकाच महत्त्वाचा वाटला म्हणून खरडलं.

4 comments:

  1. रीस्पेक्ट अ‍ॅन्ड सपोर्ट यूवर व्यूज. छान लिहिलयस. होप ह्यानी लोकांना अक्कल येईल.

    ReplyDelete
  2. अगदी खरे आहे...आजकाल गडकिल्ल्यांवर जाऊन दारू,कोंबड्या कापल्या की ट्रेक सफल संपूर्ण झाला असे बऱ्याच लोकांना वाटते.मी हरिश्चंद्र गडा वर गेल्या वर्षी काही रोमिओना झापले होते,पण दुर्देवाने जोपर्यंत 'लाठी तंत्र' नाही ना तोपर्यंत बऱ्याच जणांना समजत नाही.सध्या सगळी कडे वाहने जातात म्हणून कोणी दामू,सोंड्या,हरी जाऊन राजगड,तिकोना अश्या ठिकाणी शनिवार रविवार casually जाऊन वाट लावतो...कुठे तरी थांबवायला पाहिजे ...लोकांनी मनापासून ठरवले तरच होईल...

    ReplyDelete
  3. shikleli mandalich kashi asanskrut pane wagtat, ek changle udaharan. Pratyek gadache entrance la hya lekhachi pati asawi, Prakash deo (prakashwata.blogspot.com)

    ReplyDelete
  4. Nehami yenara ha anubhav aahe. ani ha anubhav fakt killyavar nahi tar gavat agadi shaharat, train madhun jatanahi yeto.
    Maze 100% ase mat aahe ki bharatiy janatela civic sense nahi. Swacchhata hi fakt gharachi nahi tar sampurna parisarachi asavi lagate hi shikavan nahi. tase snaskarach aaplyavar lahanpanapasun hot nahit.
    yala upay donach - Fatake dene kiva swayam shista.

    ReplyDelete