Thursday, August 4, 2016

दुर्ग खांदेरी

खांदेरी..! मराठ्यांच्या आरमारी इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार!! .. खांदेरीच्या कवेत असलेल्या धक्क्यावर आमची नांव लागली. पायउतार होतांना अंगावर रोमांच उभे रहात होते. समोरच कान्होजी आंग्रे द्विप असं नांव असलेली पाटी होती. माझं खूप वर्षांपासून असलेलं स्वप्न आज साकारत होतं. या खांदेरीचा निर्मितीपासूनचा इतिहासच मुळी, केवळ मराठी माणूसच नव्हे तर प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने तट्ट फुगावी असा ज्वलंत आहे. 



मराठे आणि सिद्दी यांच्यातील युद्धांत सिद्दीला इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बंदराचा आश्रय मिळत असे. राजांच्या मनांतून इंग्रजांनाही घालवून देण्याचे येत असे पण मुंबईच्या उत्तरेस असलेले पोर्तुगिज इंग्रजांच्या मदतीस येत असत. अनेक प्रयत्न करुनही महाराजांची जंजिर्यावर मात्रा चालत नव्हती आणि सिद्दी शिरजोर होत चालला होता. मुंबईकर इंग्रज आणि जंजिरा यांच्यात पाचर बसावी म्हणून महाराजांनी जंजिर्याच्या उत्तरेला ३० मैलांवर आणि मुंबई दक्षिणेला १५ मैलांवर असलेल्या खांदेरी बेटावर जलदुर्ग बांधण्याचे निश्चित केलं. इ.स. १६७९ च्या पावसाळ्यात आरमार अधिकारी मायनाक भंडारी यांनी खांदेरी बेटावर दिडशे मावळ्यांसोबत दुर्गबांधणीचे काम सुरु केलं. या सगळ्यांनी दुर्गबांधणीवेळी कामकरी आणि इंग्रज/ सिद्दी यांचा हल्ला झाल्यावर तो परतवून लावण्यासाठी धारकरी अशा दुहेरी भुमिका बजावल्या. पुढील सहा महिने इंग्रजांनी या कामात खो घालण्याचे सगळ्या तर्हेचे प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी त्यांना मायनाक व सहकार्यांच्या प्रतिकारामुळे हात हलवत फिरावे लागले. थळच्या किनार्यावरुन खांदेरी बेटावर रसद पोहोचवली जात असे. या परिसरात गस्त घालणार्या इंग्रज आरमाराला चकवून कशा तर्हेने छोट्या होड्यांतून खांदेरीवर रसद पोहोच होई याची त्या काळातील इंग्रजांच्या पत्रांतून थोडीफार कल्पना येते. खांदेरी युद्धाच्या आधी इंग्रजांना त्यांच्या आरमाराचा मोठा गर्व होता. खांदेरी बेटाच्या परिसरात खूप खडक आहेत त्यामुळे मोठी आरमारी जहाजे नेणे अवघड जाई, पण मराठ्यांच्या लहान होड्या मात्र आरामात ये जा करीत असत. इंग्रजांनी पुढे या युद्धांत सिद्दीचीही मदत घेतली पण खांदेरीवरुन मायनाक यांनी तर थळवरुन दर्यासारंग दौलतखानाने इंग्रज आणि सिद्दी या दोघांनाही जेरीस आणले. शेवटी इंग्रजांना महाराजांबरोबर तह करणे भाग पडले व त्यांनी खांदेरी परिसरातून आपले आरमार काढून घेतले. 
पुढे इ.स. १७०१ मध्ये सिद्दी याकूतखानाने खांदेरीवर हल्ला केला पण तोही मराठ्यांनी परतवून लावला. 
इ.स. १७१८ च्या सुमारास कान्होजी आंग्रेंच्या ताब्यात खांदेरी असतांना मुंबईचा गव्हर्नर बून याने -
व्हिक्टरी- २४ तोफा
ब्रिटानिया- १८ तोफा
रिव्हेंज, फेम, ईगल, प्रिन्सेस, अॅकमिलिया - प्रत्येकी १६ तोफा
हॉक, डिफायन्स - प्रत्येकी १४ तोफा
हाऊंड अँटीलॉप, टायगर, फ्लाय, फेरेट, स्विफ्ट- प्रत्येकी ८ तोफा
ट्रेक, विझल, लेपर्ड, स्क्विरल- प्रत्येकी ६ तोफा
अशा एकूण १८ मातब्बर युद्धनौका, बॉम्ब फेकणार्या हंटर व बॉम्ब या दोन स्वतंत्र युद्धनौका, सालमँडर नावाचे आधुनिक अग्निक्षेपक जहाज, या सगळ्या जहाजांवर काम करणारे ३००० खलाशी ..
.. एवढा जामानिमा घेऊन १ नोव्हेंबर १७१८ रोजी खांदेरीवर हल्ला चढवला. २५ दिवस नुसता धूर व आवाज काढून २४ नोव्हेंबरला हे पराभूत इंग्रज आरमार मुंबई बेटावर परत फिरलं. यावेळी खांदेरीचा किल्लेदार होता माणकोजी सूर्यवंशी आणि त्याचे सैनिक होते फक्त ५००. माणकोजींनी या युद्धावेळी शत्रूची नाकेबंदी करणे, शत्रुवर रात्रीच्या वेळी हल्ला करणे, बेटावर उतरलेल्या शत्रुवर दगडांचा मारा करणे या युक्त्या वापरल्याच पण त्यांनी तोफखानाही जरुरीपुरताच वापरला. 
इ.स. १८१४ मध्ये खांदेरी पेशव्यांच्या ताब्यात आला पण तिनच वर्षात तो पुन्हा आंग्र्यांकडे गेला. शेवटी इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात हा दुर्ग गेला.

इतिहासाचा तास व जेवण एकत्रच आटोपल्यावर आपटेकाकांनी सगळ्यांना प्रथम दीपगृहाला भेट देऊया सांगितलं. तिकडे जातांना वाटेत तटबंदीशेजारी एक श्वानमुख म्हणजे कुत्र्याचं तोंड असलेली तोफ त्यांनी दाखवली.



 दिपगृह असलेली टेकडी पायर्यानी चढून गेल्यावर एक तोफ रंगवून ठेवलेली दिसली. दिपगृह पाहता येईल काय ते विचारून पाहू म्हटल्यावर तेथील कर्मचारी तयार झाला व आम्हाला दिपगृह पाहण्याचा बोनस मिळाला.



 हा कर्मचारी नगर जिल्ह्यातील एका गावातला होता. आम्ही नासिकचे ऐकल्यावर एकदम माहेरचं माणूस भेटल्यागत त्याला आनंद झाला. हे दिपगृह इंग्रजांनी इ.स. जून १८६७ मध्ये बांधलं. त्यावेळी त्याला केनरी लाईटहाउस नांव दिलं होतं. (इंग्रज उंदेरी खांदेरी बेटांचा उल्लेख हेनरी केनरी करीत असत) १७ ऑक्टो. १९९३ या दीपगृहाचे नांव कान्होजी आंग्रे दिपगृह असे केले गेले. 
दिपगृह बघून झाल्यावर जवळच असलेल्या एका निसर्गनवलाकडे निघालो. या बेटावरील हे एक आकर्षण आहे. इथे एका झाडाखाली एक मोठी शिळा आहे. तिच्यावर दगडाने आघात  केल्यावर धातूप्रमाणे आवाज येतो. या बेटावर येणारा प्रत्येक जण या शिळेला ठोकत असतो. तरीही शिळेवर असणारे गोल उथळ सुबक खळगे कसले हा प्रश्नभुंगा उरलाच.


  
टेकडी उतरून वेताळमंदिरापासून तटबंदीकडेने दुर्गफेरी करायचं ठरलं. वेताळाच्या मंदिरात तांदळा आहे. मंदिरात एका माशाच्या सांगाड्याचा भाग रंगवून टांगलेला आहे. 



हा वेताळदेव म्हणजे कोळी लोकांचा देव आहे. होळीच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते. बोकडबळी दिले जातात. आम्ही गेलो तेव्हाही एक बोकड नुकताच हुतात्मा झालेला होता.
तटावरून फेरी मारताना भक्कम बांधकामाची कल्पना येत होती. सागराच्या अजस्त्र लाटा थेट तटबंदीवर येऊन धडकून इजा पोहोचवू नयेत यासाठी तटाच्या बाहेरील बाजूस दगडांच्या राशी रचलेल्या दिसत होत्या.



 बुरुजांवरील तोफा न्याहाळत दिपगृहाच्या बाजूला आलो देखील. वाटेत तटबंदीतच एक चोरवाट केलेली दिसली. 



दिपगृह टेकडीच्या पायथ्याकडे एक छोटा तलाव आहे. इथून आणखी पुढे आल्यावर चाकाच्या तोफा आहेत. 



पैकी एका तोफेवर १८१३ की १८१८ साल कोरलेलं आढळलं.



उंदेरी दुर्गापेक्षा खांदेरी दुर्गावर पर्यटक जास्त येत असल्याने विद्रुपीकरणही यथेच्छ आहे. सगळ्या  जागांवर लोकांनी बापजाद्याची मालमत्ता असल्यासारखी नावे कोरलेली आहेत. तटाचे दगड, तोफा, बुरुज, चोरदरवाजाच्या आत, तो धातूचा दगड... सगळीकडे कुलेखनाचे कोलाज आहेत. केवळ नाईलाज म्हणून लाईटहाउसच्या लाईटवर काही कोरलेलं नाहीये.
बेटाची फेरी पूर्ण झाल्यावरही काही राहिलंय का या विचाराने हुरहुरत होतो. बोटवाल्याचीही आता घाई सुरु झाली होती. बोट किनार्याकडे जातांनाही खांदेरी उंदेरी बेटांकडेच चित्त स्थिरावलं होतं. परतीच्या प्रवासाच्या आठवणीही धूसर होत जातील इतकं या दुर्गबेटांचे गारुड मनावर कायम आहे.

-हेम.

संदर्भ:
श्री. ग.भा. मेहेंदळे यांचं 'शिवछ्त्रपतींचे आरमार'
 श्री. सतिश अक्कलकोटांचे 'दुर्ग'
 श्री. भगवान चिले यांचे 'वेध जलदुर्गांचा'
 डॉ. बी. के. आपटे यांचं ' हिस्टरी ऑफ मराठा नेव्ही अँड मर्चंटशिप' 

No comments:

Post a Comment