Thursday, January 26, 2017

पुस्तक परिचय- पारधः आईशमनचा चित्तथरारक पाठलाग.. लेखकः अशोक जैन


दुसर्या महायुद्धाच्या काळांत हिटलरच्या नाझी राजवटीत युरोपमधील ६० लाख निरपराध ज्यू धर्मियांची कत्तल करण्यात आली. जर्मनीत जर्मनीने व्यापलेल्या भूभागांत उभारण्यात आलेल्या ऑख्शविट्श, कुल्पहाफ, लुब्लिन, बेल्झिक, स्पेबिबोर आणि ट्रेबालिन्का या सहा छळछावण्यांमध्ये बेल्जिअम, फ्रान्स, हॉलंड ग्रिस येथून आगगाड्या भरभरून ज्यू आणले जात. गाडी एका खास फलाटावर उभी केली जाई. प्रवाशांचं सामान काढून घेतलं जाई. जे कैदी काम करण्यास लायक असतील अशा कैद्यांना विविध छावण्यांत पाठवलं जाई आणि ज्यांना ठार मारायचं त्यांना विषारी वायूच्या नव्या स्मशानगृहांत पाठवलं जाई. ऑख्शविट्श येथे भूमिगत मोठं न्हाणीघर होतं. त्याला लागूनच गॅसचेंबर्स होत्या. न्हाणीघरांत सर्वांना आपापले कपडे कुठे टांगून ठेवले आहेत हे नीट लक्षात ठेवा असं सांगितलं जाई. अर्थात ते दिशाभूल करण्यासाठीच असे. कारण ते पुन्हा त्या दालनांत आणले जाणारच नव्हते. मग त्यांची रवानगी गॅसचेंबरमध्ये केली जाई. बायका आपल्या चिमुकल्या बाळांना झग्याच्या आड लपवत पण सुरक्षा पोलीस बायकांचे कपडेही तपासत लपवलेल्या बाळांना बाहेर खेचून अलग करीत कैद्यांबरोबर त्यांनाही गॅसचेंबरमध्ये कोंबत. तिथं नव्यानं सुधारित गॅस चेंबर्स होत्या. चेंबरचं दार घट्ट लावून विषारी वायू आत सोडला जाई. अर्ध्या तासांत सारा खेळ संपे. प्रेतं बाहेर काढतांना त्यांची तपासणी होई. प्रत्येकाचं तोंड उचकटलं जाई जर कोणी सोन्याचा दात बसवला असेल तर तो उपटून काढला जाई. बायकांच्या कानातील ईअररिंग कानाची पाळी कापून काढली जाई, नंतर प्रेतं विद्युतदाहिनींमध्ये फेकली जात.
नंतर कैद्यांच्या सामानसुमानाची वर्गवारी केली जाई. मौल्यवान वस्तू दरमहा बर्लिनच्या राईश बँकेकडे पाठवल्या जात, सोन्याचे दात वितळवून ते एसएसच्या मेडिकल विभागाकडे रवाना केले जात. कैद्यांचे कपडे स्वच्छ करून लष्करी कारखान्यांकडे गुलाम म्हणून असलेल्या कामगारांना वापरण्यासाठी पाठवले जात.
ऑख्शविट्श येथील छळछावणीत डिसेंबर १९४३ मध्येदेखील हा भयंकर नरसंहार सुरु होता. तिथे एकूण ३० लाख ज्यूंना ठार करण्यात आलं. पैकी २५ लाख जण गॅसचेंबरमध्ये कोंबून मारले गेले. या छावणीला मृत्यूची छावणी असंच नांव पडलं....

---- या भिषण संहाराला हिटलरच्या बरोबरीने जबाबदार होता तो नाझी नेता ॅडॉल्फ आईशमन त्याचे साथीदार. आईशमान हा क्रूरकर्माच होता. नाझी तर त्याला ' फायनल सोल्युशन ऑफ ज्युईश प्रॉब्लेम' म्हणत
http://japanfocus.org/data/adolf_eichmann.png
हाच तो अ‍ॅडॉल्फ आईशमन: ज्यूंच्या नरसंहारातील क्रूरकर्मा

महायुद्धानंतर आईशमान पळून गेला आणि अर्जेंटिनामध्ये नांव बदलून लपून राहिला. परंतू तब्बल १४ वर्षांनंतर इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तहेर संघटनेने महत्प्रयासाने त्याला शोधून काढले त्याला विमानांत बसवून मोठ्या शिताफीने, इस्त्रायलला पळवून आणलं. त्याच्यावर इस्त्रायलमध्ये खटला भरण्यात आला त्याला त्याच्या ५६ व्या वर्षी, ३१ मे १९६२ रोजी रामलेह तुरुंगात फाशी देण्यात आली.
हा सर्व अपहरणाचा इतिहास अत्यंत चित्तथरारक नाट्यपूर्ण आहे. आईशमनला पकडण्याच्या या मोहिमेचे नेतृत्व त्यावेळचा 'मोसाद' गुप्तहेर संघटनेचा प्रमुख इस्सेर हॅरेल याने केले. 

http://www.eilatgordinlevitan.com/dvinsk/dv_pix/stories/102408_05_b.gif 
 'मोसाद' गुप्तहेर संघटनेचा प्रमुख इस्सेर हॅरेल.

त्याने ' द हाऊस ऑन गॅरिबाल्डी स्ट्रीट' या पुस्तकांत संपूर्ण शोध मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत लिहिलेला आहे. 
हॅरेलच्या या पुस्तकातील अधिकृत वृत्तांताचा आधार घेऊनच श्री. अशोक जैन यांनी 'पारधः क्रूरकर्मा आईशमनचा चित्तथरारक पाठलाग..' हे पुस्तक लिहिलं आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशीत केलेलं हे पुस्तक अत्यंत गतिमान, रोमांचकारी व खिळवून ठेवणारं आहे.
.. . मी परवाच हे पुस्तक वाचून संपवलं तेव्हा एक विचित्र योग लक्षात आला, की पुस्तक संपवलं त्या दिवशी ३१ मे तारीख होती आणि क्रूरकर्मा आईशमनला फाशी देण्याला परवा बरोब्बर ५० वर्षे पूर्ण झाली.
'मोसाद' च्या चलाख, चतूर आणि चपळ गुप्तहेरांना हॅटस् ऑफ..!!


छायाचित्रे आंतरजालावरुन साभार.

-हेमंत पोखरणकर. 02.06.2012

No comments:

Post a Comment